फैजपूर पालिकेच्या आरोग्य विभागात साहित्य खोटाळा

माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांची तक्रार : फैजपूर मुख्याधिकार्‍यांनी दिले चौकशीचे आश्वासन


फैजपूर : पालिकेच्या आरोग्य विभागात पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शौचालय देखभालीसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी लेखी तक्रार वरीष्ठ स्तरावर केली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी वैभव लोंढे यांना साहित्य दाखवण्याची वेळ पत्रकारांवर आली आहे. दरम्यान, तब्बल पाच लाख 65 हजार 150 रुपयांची खरेदी करण्यात आली असून मजेशीर बाब म्हणजे साहित्य पुरवठा करणारी संस्थाही आरोग्य निरीक्षकांच्या भावाचीच आहे व या खरेदीची प्रक्रिया सुद्धा केवळ आठ दिवसात पूर्ण करण्यात आल्याने प्रशासकीय राजवटीतील या खरेदीबाबत शंका व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेण्याची अपेक्षा
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत शौचालय देखभाल (टॉयलेट मेंटेनन्स) साठी पाच लाख 65 हजार 150 रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. या साहित्य खरेदीसाठी 10 फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली तर इतर साहित्य पुरवण्यासाठी मेहतर वाल्मीक जनकल्याण सेवा संस्था यांनी ही निविदा भरली होती व त्यांची निविदा मंजूर सुद्धा झाली. 22 फेब्रुवारी रोजी पुरवठादार संस्था व पालिका यांच्या दर कमी करण्यासंदर्भात वाटाघाटी होऊन 4 मार्च रोजी संबंधित संस्थेला मंजुरीचे पत्र व कार्यादेश देण्यात आले. त्यानंतर संस्थेने साहित्य पुरवठा करून 8 मार्च रोजी केला व आरोग्य विभागाने तत्काळ व्हाउचर बिल तयार करुन लेखापाल यांच्याकडे सादर केले तर 9 मार्च रोजी पुरवठादार संस्थेने बिल मिळण्याची मागणीदेखील केल्याचे पत्र आहे त्यामुळे तत्काळ 10 मार्च रोजी या पुरवठा संस्थेला पाच लाख 65 हजार 150 रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे पुरवठादार संस्थेने त्यासाठी पाच बिले सादर केली असून या पाचही बिलांवर तारखा, सह्या, बिल कोणाच्या नावे सादर केले याचा साधा उल्लेखही नाही तर वाटाघाटी होऊन सुद्धा साहित्य खरेदी अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्याचे बिलांवरून दिसते. त्यावरही कडी म्हणजे साहित्य पुरवठा करणारी संस्थाही आरोग्य निरीक्षकांच्या भावाचीच असल्याने या साहित्य खरेदीत गोलमाल असल्याची शंका व्यक्त होत आहे.


प्रशासकीय राजवटीत चाललेय काय?
संबंधित बिल हे आरोग्य विभागामार्फत तयार होऊन ते लेखापाल त्यानंतर मुख्याधिकारी व पुन्हा लेखापाल यांच्याकडे तपासणीसाठी जाते व ही बिले सादर होत असताना एकानेही काळजीने ते तपासले नाही याचे नवल वाटत आहे. बिलांची बेरीज व प्रत्यक्ष अदा करण्यात आलेली रक्कम यात जवळपास 36 हजार 500 रुपयांची तफावत असल्याचे ही अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे व सदरची रक्कम ही स्वपुरवठादार संस्थेला ज्यादा गेल्याचेही निदर्शनास आल्याने प्रशासकीय राजवटीत हे चालले तरी काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सर्वच साहित्य पालिकेत : मुख्याधिकारी
साहित्य खरेदीप्रकरणी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वस ाहित्य पालिकेत असल्याचा खुलासा केला. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल व मागील बिलांसंदर्भात चौकशी करण्यात येईल, असे मुख्याधिकारी वैभव लोंढे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !