भुसावळातील प्रार्थनास्थळांसाठी ध्वनीक्षेपक लावण्यासाठी परवानगी आवश्यक
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे : भुसावळात मुस्लीम समुदायाची बैठक : मौलाना व ट्रस्टींकडून सकारात्मक प्रतिसाद : दोन दिवसांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी
भुसावळ : मंदिर व मशीद वा अन्य धार्मिक स्थळांवर भोंगे वा ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे शिवाय रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान कोणत्याही परीस्थितीत भोंगा वा लाऊड स्पीकरचा कुणीही वापर करणार नाही, अशा सूचना उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा दाखला देत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथे दिल्या. गुरुवार, 21 रोजी सकाळी 11 वाजता खडका रोडवरील ईदगाह मैदानाजवळील हिरा हॉलमध्ये मुस्लीम समुदायाची बैठक झाली. बैठकीला उपस्थित असलेल्या मौलाना व ट्रस्टींनी सकारात्मक प्रतिसाद देत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, अशी ग्वाही प्रसंगी दिली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, भुसावळ तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात शहरातील विविध मशिदींच्या मौलांनासह ट्रस्टींनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त करीत नियमांचे पालन करणार असल्याचे यावेळी सांगितले.

ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी बंधनकारकच
पोलिस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले की, मंदिर, मशीद वा अन्य प्रार्थना स्थळांवर भोंगा वा लाऊडस्पीकर लावण्यासाठी तसेच सकाळी सहा ते 10 दरम्यान त्याचा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल शिवाय रात्री दहा ते पहाटे सहा दरम्यान लाऊड स्पीकरचा वापर कुणालाही करता येणार नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये दिलेल्या आदेशाची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. दरम्यान, प्रसंगी मुस्लीम समुदायाने दोन दिवसानंतर नियमांचे पालन करण्याची ग्वाही मुस्लीम समाजबांधवांनी यावेळी दिल्याने पोलिस उपअधीक्षकांनी समाजाचे आभार मानले. या बैठकीला प्रार्थनास्थळांचे ट्रस्टी, मौलवी, मुस्लीम समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज मंदिराबाबत होणार बैठक
शुक्रवार, 22 रोजी शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील मंदिरांमध्ये पोलिस प्रशासनातर्फे बैठक घेण्यात येणार आहे शिवाय अन्य धार्मिक स्थळांमध्ये याचप्रमाणे बैठक होईल व सर्वांसाठी नियम एकसमानच असल्याचे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.