मुक्ताईनगर तहसीलच्या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन

प्रांताधिकार्‍यांनी धाव घेतल्यानंतर तहसीलला ‘कुलूप’ टळले : तक्रारदारांना न्याय मिळण्याची आशा


मुक्ताईनगर : तालुक्यातील रेशनवरील धान्य घेणार्‍या असंख्य नागरीकांच्या पुरवठा विभागाविषयी तक्रारी असल्याने शुक्रवार, 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांचे दालन गाठत तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा आरोप केला होता तर तहसीलच्या कारभाराविरोधात सेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे सोमवार, 2 रोजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वात महिला-पुरुषांसह तालुका शिवसेनेने सकाळी 11 ते दिड वाजेपर्यंत तहसीलदारांच्या दालनासमोर आंदोलन केले. सुमारे अडीच तास निदर्शने करण्यात आल्याने खळबळ उडाली. भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी धाव घेतल्यानंतर तहसीलला कुलूप ठोकण्याचे आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी तक्रारदारांना न्याय देण्याची भूमिका प्रांतांनी मांडत तहसीलदारांना कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश दिले. शिवसेना पदाधिकार्‍यांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केल्याने परीसर दणाणला.

जळगावात दुचाकी चोरट्यांचा उच्छाद कायम : पत्रकाराची दुचाकी लांबवली 

तहसील कार्यालयाला ‘कुलूप’ टळले
सोमवारी सकाळी आंदोलनादरम्यान नागरीकांच्या तक्रारींचा पाढा आमदार पाटील यांनी तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासमोर वाचला व चांगलीच कान उघाडणी केली. प्रांताधिकारी लवकर न आल्याने आता तहसीलदारांच्या दालनाला कुलूपच लावतो, असा पवित्रा आमदारांनी घेतला तर कार्यकर्त्यांनी आमदारांना कुलूपही आणून दिले मात्र दोन तासानंतर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे हे तहसीलमध्ये आले. प्रांताधिकार्‍यांसमोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार व पुरवठा विभागात पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम होत नाही, असा आरोप करीत तहसीलदार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अन्यथा शिवसेना स्टाईलने मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला.



सोपान नगरात घर जळाले : संसार आला उघड्यावर

धाबेपिंप्रीकरांना रेशनकार्डच नाही
मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री येथील नागरीकांनी दोन महिन्यांपूर्वी शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी अर्ज दिला होता मात्र अद्यापही ऑनलाईन कामकाज झालेले नाही तसेच तालुक्यातील अनेक शिधापत्रिका धारकांनी ऑनलाईनसह अन्य कामांसाठी तहसीलमध्ये अर्ज केलेले आहे. पण त्यांचीही कामे झाली नाहीत. नाहक नागरीकांना गावातून भर उन्हात तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मांडण्यात आली शिवाय तालुक्यातील वढवे गावाजवळ एका व्यक्तीने गावनाल्यात अवैध मुरूम टाकल्याने शेतकर्‍याच्या शेतात पाणी शिरत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले शिवाय तहसीलदारांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याचे पदाधिकारी यावेळी म्हणाले.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, प्रफुल पाटील, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, आरीफ आझाद, शहरप्रमुख गणेश टोंगे, अफसर खान, गोपाळ सोनवणे, नगरसेवक मुकेश वानखेडे, संतोष कोळी, निलेश शिरसाट, संतोष मराठे, नवनीत पाटील, पंकज राणे, महेंद्र मोंढाळे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, शुभम शर्मा यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

समस्या सुटणार : तहसीलदारांनाही सूचना : प्रांताधिकारी
तहसील कार्यालयातील काही प्रश्नांसंदर्भात आमदारांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. रेशनकार्डाबाबत ज्या गावातील समस्या आहेत त्या अर्जांमध्ये त्रृटी होत्या मात्र आता त्या गावातच रेशनकार्ड शिबिर लावण्यात येणार असल्याने तो प्रश्न सुटणार आहे शिवाय इतर प्रश्नही सोडवण्याच्या सूचना तहसीलदारांना करण्यात आल्याचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !