वाघ नगरातील 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
जळगाव : शहरातील जिजाऊ नगर, वाघ नगर भागातील 22 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवार, 7 मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आशा विशाल इंगळे (22, जिजाऊ नगर, वाघ नगर) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तालुका पोलिसात नोंद
आशा विशाल इंगळे ह्या पती विशाल, सासू सासरे आणि दीर यांच्यासह वास्तव्यास होत्या. पती विशाल मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. विशाल आणि दोन भाऊ सोबत एकत्रच राहतात. शनिवार, 7 मे रोजी सकाळी 9 वाजता घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या संतापाच्या भरात आशा इंगळे यांनी घराच्या वरच्या मजल्यावर जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या घेतल्याची चर्चा आहे. हा प्रकार त्यांची दिराणी मनिषा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. शेजारी राहणार्या नागरीकांनी धाव घेवून आशाबाई यांना खाली उतरवून खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, शनिवारी 7 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.