पट्टेदार वाघाचे सुकळी परीसरात पुन्हा दर्शन ; शेतकर्‍याने मोबाईलमध्ये छबी केली कैद


मुक्ताईनगर : गत आठवड्यात तालुक्यातील सुकळी परीसरातील केळी बागेत एक पट्टेदार वाघ विश्रांती घेत असलेल्या अवस्थेत आढळून आला होता.वाघाची मजेदार छबी नागरीकांनी मोबाईलमध्ये शुट केल्याची घटना ताजी असतानाच येथील शेतकरी वैभव पाटील हे शनिवार, 7 रोजी शेत नांगरत असताना शेतकर्‍यांना रात्री दहाच्या सुमारास ट्रॅक्टरच्या लाईटच्या प्रकाशात समोर बांधावर पट्टेदार वाघ दिसुन आला. स्वत:जवळच्या मोबाईलमध्ये पाटील यांनी समोरचा देखावा कैद केला.

रान डुकराची केली होती शिकार
तीन दिवसांपूर्वी शेजारच्या केळी बागेत वाघाने रानडुकराची शिकार केली होती.तसेच गुराख्यासह आणखी दोघांनाच्याही नजरेत वाघ दिसुन आला. यामुळे याच परीसरात वाघाचा मुक्त संचार असल्याचे सिद्ध होत आहे. या भागातील शेतकर्‍यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. वनविभागाकडुन एक प्रशिक्षित टिम नेमून गस्त घालावी तसेच संवेदनशील भागातील केळीबागेत शेतीकामे करतांना शेतकर्‍यांना सहकार्य करावे, अशी मागणीवजा अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी वर्गाची आहे मात्र वनविभागाच्या वरीष्ठ पातळीवरुन सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाघांचा मुक्त संचार
देशभरातून पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील (वडोदा वनक्षेत्र) मुक्ताई-भवानी व्याघ्र अधिवास क्षेत्र असून या क्षेत्रात आठ-दहा वाघांचा मुक्त संचार असल्याने जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे मात्र आजपर्यत या अधिवास क्षेत्राचा अपेक्षित विकास हवा तितका झाला नाही. गेल्या सात महिन्यांपासून वैभवशाली वनक्षेत्र प्रभारी कार्यभारावर तग धरुन आहे. एक अनुभवी कर्तव्यदक्ष अधिकारी यांची नेमणूक सुध्दा वनविभागाकडुन होत नसेल तर इतर व्याघ्रसंवर्धनाविषयी वनविभाग कोसो दुर आहे. या संवेदनशील वनक्षेत्राबाबत काही महिन्यांपूर्वी मंत्री मंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठकसुद्धा पार पडली मात्र विकासाबाबत पुढे काय झाले माहिती नाही. तसेच राजकिय कारकिर्दीत वजनदार मंत्री पदे लाभलेल्या वाघांच्या जिल्ह्यात वाघ उपेक्षित असुन जंगलात पायाभुत सुविधा नसल्याने शेतीशिवारात भटकावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !