रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रांत : आरक्षीत डब्यांसह विनातिकीट प्रवास करणार्यांवर दंडात्मक कारवाई
भुसावळ : वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. या फुकट्यांना पायबंद घालण्यासाठी भुसावळ विभागात तिकीट तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी 75 तिकीट तपासनिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यांना दररोज एकूण 30 लाख रुपये दंड वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. शुक्रवारी तर वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक यांनी देखील स्वत: महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये अचानक तिकीट तपासणी केली.
अपघातांची मालिका कायम : महामार्गावरील भीषण अपघातात सात जण ठार
फुकट्यांच्या गोटात प्रचंड खळबळ
लग्नसराई, उन्हाळी सुटीमुळे रेल्वे गाड्यांची गर्दी वाढली आहे. त्यात अनेक जण विनातिकीट, आरक्षण नसताना आरक्षित डब्यातून प्रवास, स्लीपर कोचचे आरक्षण असताना एसी डब्यातून प्रवास करतात. काही प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त लगेज सोबत बाळगतात. यामुळे रेल्वेचे नुकसान होते. शिवाय नियमानुसार तिकीट काढून, आरक्षण करून प्रवास करणार्यांना त्रास होतो. याबाबत ओरड वाढल्याने डीआरएम एस.एस.केडिया, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी भुसावळ विभागात 1 मे पासून कारवाई सुरू केली. त्यासाठी 75 तिकीट तपासणीसाठी एक स्वतंत्र पथक नेमले. भुसावळातून खंडवा, बडनेरा, मनमाड मार्गावर हे पथक विविध स्थानके, धावत्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अचानक तिकीट तपासणी करते. त्यात नियमबाह्य प्रवास करणार्यांकडून दंड वसूल केला जातो.
स्वत: केली महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तपासणी
सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते बडनेरा दरम्यान स्वत: प्रवाशांकडील तिकिट तपासणी केली. सहा तिकीट तपासणीस मदतीला होते. विनातिकीट व नियमबाह्य प्रवास करणार्या प्रवाशांवर कारवाईचे आदेश सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी यावेळी पथकाला दिले.