चर्चा तर होणारच ! मुक्ताईनगरात चोरी झाली 70 हजारांची आवई उठली मात्र 30 लाखांची
Muktainagar Daroda मुक्ताईनगर : शहरातील भुसावळ रोड वरील भरचौकात असलेल्या अंबिका ज्वेलर्स या दुकानात 8 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे दरवाजाचे कुलुपाजवळील पट्टी तोडून चोरट्यांनी सुमारे 70 हजारांचा लांबवला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या वायरी तोडून कॅमेरा वार रूमच्या मशिनरी ( डिव्हिआर) देखील गायब केल्याने दिसून आले. दरम्यान, चोरी केवळ 70 हजारांची झाली असलीतरी दिवसभर मात्र माध्यमांमध्ये 30 लाखांच्या चोरीचे वृत्त व्हायरल झाल्याने यंत्रणांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.
धाडसी चोरीने उडाली खळबळ
शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफा दुकानात रविवारी रात्री धाडसी चोरी झाल्याची ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्वेलर्सचे संचालक अनिल शुरपाटणे यांना सकाळी दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे व पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व दुकानात तपासणी, पंचनामा केला. जळगावहून तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने दुकानाजवळच घिरट्या मारल्या तसेच ठसेतज्ञ यांनी ठसेचे नमुने घेतले आहे. भुसावळ रोडवरील रात्रभर सतत रहदारीची वर्दळ व भर बाजारपेठेत असलेल्या ज्वेलर्स दुकानातील या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. मुक्ताईनगर पोलीसांसह प्रभारी उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे , जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व त्यांचे पथक सोमवारी दिवसभर मुक्ताईनगरात तळ ठोकुन होते.
पट्टेदार वाघाचे सुकळी परीसरात पुन्हा दर्शन ; शेतकर्याने मोबाईलमध्ये छबी केली कैद
लोकप्रतिनिधींची धाव
चोरीची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुका प्रमूख छोटू भोई, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, माजी उपजिल्हा प्रमूख गोपाळ सोनवणे, माजी सरपंच रामभाऊ पूनासे यांनी घटनास्थळी भेट दिली व ज्वेलर्स चे संचालक चंद्रकांत शुरपाटणे, अनिल शुरपाटणे सचिन शुरपाटणे यांच्याशी चर्चा केली.
पोलिसात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी अनिल चंद्रकांत शुरपाटणे यांनी फिर्याद दिली. त्यात दुकानातील दोन किलो चांदी जुनी व नवी (किंमत 66 हजार) व सीसीटिव्ही डीव्हीआर चार हजारांचे मिळून 70 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.
शहरात सीसीटीव्ही आवश्यक
मुक्ताईनगरात तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक कडलग असतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीतुन (डिपीडीसी शहरातील महत्वाचे चौक , शाळा, महाविद्यालय ,महामार्ग अशा 13 ठिकाणी 40 सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. देखभाल दुरूस्तीचे नावाखाली ते सर्व कॅमेरे आता नामशेष झालेले आहेत. मध्यंतरी या कॅमेर्यांची देखभाल दुरूस्ती नगरपंचायतीने करावी, असे ठरले होते पण तेही बारगळले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील डीपीडीसी योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे सांगितले होते.