आमदगावात पाच लाखांची धाडसी चोरी
बोदवड : तालुक्यातील आमदगाव येथे राहत्या घरात ठेवलेले चार लाखांचे दागिने व एक लाखांची रोकड मिळून सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. गुरुवारी सकाळी सहा वाजता ही चोरी उघडकीस आल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
धाडसी चोरीमुळे उडाली खळबळ
अज्ञात चोरट्यांनी कडू गोविंदा पाटील यांच्या राहत्या घरात प्रवेश करून गव्हाच्या कोठीत ठेवलेले चार लाख रुपये किंमतीचे आठ तोळे सोने व कपाटात ठेवलेले एक लाख रुपये रोख अशी एकूण पाच लाखांचा ऐवज लांबवला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडू पाटील हे कुटुंबीयांसोबत घराच्या बाहेर झोपले होते. त्यांच्या घरांना दोन दरवाजे असून समोरच्या दरवाजासमोर झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी मागच्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला व चोरी करून पसार झाले. या प्रकरणी गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय अंकुश जाधव करीत आहेत. श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर त्याने गावाबाहेरील नाडगाव रस्त्याचा माग दाखवला.