यात्रेत गांजा विकण्याचा डाव उधळला : दीड लाखांच्या १० किलो गांजासह तरुण अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात
अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रेत विक्रीसाठी गांजा आणणाया तरुणाची पोलिसांनी नशा उतरवत दीड लाखाचा १० किलो गांजा जप्त केला. मंगरूळ शिरूड फाट्याजवळील माध्यमिक शाळेजवळ १६ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेला पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली. संतोष अशोक ढिवरे (35, ताडेपुरा, भीमनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, अमोल पाटील, निलेश मोरे, कैलास पाटील हे १६ रोजी पालखी बंदोबस्तासाठी यात्रेत हजर असताना पोलीस निरीक्षक हिरे याना मंगरूळ शिरूड फाट्याजवळ एक तरुण उभा असून तो यात्रेत गांजा आणत विक्रीसाठी आहे, अशी माहिती मिळाली. पोलीस वाहन मंगरूळ बसस्थानकावर लावून ते पायी जात असताना आरोपीला चाहूल लागल्याने तो पळू लागताच पोलिसांनी संतोष अशोक ढिवरे (३५) यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक लाख ५० हजार रुपये किमतीचा १० किलो ३८६ ग्राम गांजाची दोन पाकीट जप्त करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला पारोळा कोर्टात हजर केले असता न्या.एम.के.पाटील यांनी २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.







