वरणगावात पाणीटंचाई निषेधार्थ भाजपातर्फे मटके फोडो आंदोलन
वरणगाव : शहरात दहा ते बारा दिवसांनी पिण्याचे पाणी येत असल्यामुळे भीषण पाणीटंचाईला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. वरणगाव शहरातील पाणीटंचाई नष्ट करून मुबलक पाणी द्या, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने नगरपालिका येथे जाऊन मटके फोडण्यात आले. आठ दिवसाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगरपरीषद प्रशासनाला दिला. भाजपातर्फे झालेले आंदोलन हे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
अखेर आंदोलकांशी केली चर्चा
भरउन्हात दोन तास नागरिक व कार्यकर्ते उभे होते. मात्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अधिकारी आंदोलन करते चे म्हणणे ऐकण्यासाठी आले नाही सर्वात शेवटी प्रशासन अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. वरणगाव शहरात 10 ते 12 दिवसांनी येत असलेले पाणी कसे लवकर देता येईल, यासाठी एकत्रित मीटिंग घेण्यात येईल व उपाययोजना करणार आहे. मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने व्हावे, उर्वरित पिण्याच्या पाण्याचे काम लवकर पूर्ण करा, अशा सूचना यासाठी पाठवतो, असेही प्रशासन अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
यावेळी नागरीकांनी वरणगाव शहरासाठी भाजपा सरकारने 24 बाय 7 अशा प्रकारचे पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सदर मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करा, वरणगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आठ दिवसात तीव्र आंदोलन करु, असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी दिला. यावेळी आंदोलनकर्ते यांच्या कडून पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो महाविकास आघाडी मुर्दाबाद अशा घोषणा देऊन पालिका परीरसर दणाणून सोडला.
यांचा आंदोलनात सहभाग
महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रणिता पाटील, चौधरी कस्तुरा, नीता तायडे, नगरसेविका माला मेढे यांच्यासह महिला भाजपचे शामराव धनगर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पैसे, अंजाळे भाजयुमो शहराध्यक्ष आकाश निमकर, रॉक कश्याप, पप्पू ठाकरे, जिल्हा सरचिटणीस डॉ. सादिक, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, कैलाश पाटील, गंभीर माळी, बापू माळी आदी उपस्थित होते.







