प्रवाशांना मोठा दिलासा : मुंबई, गोरखपूर दरम्यान चार अतिरिक्त विशेष गाड्या धावणार
भुसावळ : उन्हाळी सुट्यांचा कालावधीमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता मध्य रेल्वेतर्फे 636 उन्हाळी विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत शिवाय मुंबई आणि गोरखपूर दरम्यान चार अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून भुसावळ विभागातील प्रवाशांना मुंबई व उत्तर भारतात जाण्यासाठी या अतिरिक्त गाड्यांची सुविधा मिळाली आहे.
अशा धावणार गाड्या
01059 उन्हाळी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22 व 29 मे अशा दोन फेर्यांमध्ये मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. 01060 उन्हाळी विशेष गोरखपूर येथून 23 व 30 मे रोजी दुपारी एक वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, ललितपूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, पोखरायन, कानपूर, लखनौ, बाराबंकी, अयोध्या कँट, अयोध्या, मानकापूर, बभनान, बस्ती आणि खलीलाबाद येथे जाताना व येताना थांबे असतील. सहा तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, एक गार्ड्स ब्रेक व्हॅनसह चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक जनरेटर व्हॅन असे कोच असतील. या चार विशेष फेर्यांमुळे उन्हाळ्यात मुंबई व गोरखपूर अर्थात उत्तर भारतात प्रवास करणार्या भुसावळ विभागातील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. या चारही विशेष फेर्यांसाठी 20 मे पासून आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली आहे.







