तरुणीशी गैरवर्तन : महावितरणच्या व्यवस्थापकासह लिपिकाविरोधात गुन्हा
जळगाव : महावितरणच्या कार्यालयात कंत्राटावर काम करणार्या तरुणीशी गैरवर्तन करणार्या व्यवस्थापक व लिपिकाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. व्यवस्थापक उद्धव कडवे व लिपिक राजेंद्र आमोदकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.
अखेर दोघांविरोधात गुन्हा
तरुणीच्या फिर्यादीनुसार, ती महावितरणच्या कार्यालयात कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असतांना 2017 ते 2021 या काळात कडवे हे नेहमीच त्रास देत होते. सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतरही उशिरापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवत होते. ते व्हॉट्सऍपवर चॅटिंग करण्याची मागणी करत होते. तसेच घरी सोडून देतो, घेण्यासाठी येतो असे सांगून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणने ऐकून न घेतल्याने तीन वेळा कामावरून कमी केले. नंतर पुन्हा कामावर घेऊन त्रास देणे सुरूच ठेवले. 2021मध्ये पीडित तरुणीने काम सोडले. यानंतर 11 मे रोजी आमोदकर याने तरुणीला फोन करून जावक रजिस्टरमध्ये नोंदी घ्यायचे काम शिल्लक असल्याने तुला कडवे साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. त्यानुसार तरुणी गुरुवार, 12 मे रोजी कार्यालयात गेली. यावेळी कडवे यांनी मागे झालेल्या प्रकाराची माफी मागितली, टेक्निकल साइर्टचे लोक माझ्याविरुद्ध कट रचत आहेत, तू त्यांना सपोर्ट करते आहेस, असे मला कळाले आहे अशी विचारणा केली. तरुणीने त्यावर नकारात्मक उत्तर दिले. तुला पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करतो असे कडवेंनी सांगितले. काम संपल्यानंतर आमोदकर दुचाकीने घरी सोडून देईल, असे सांगितले; परंतु तरुणीने नकार दिला. या घडलेल्या प्रकाराची तक्रार तरुणीने महावितरणच्या विशाखा समितीकडे केली आहे; परंतु, समितीने त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
लिपिक आमोदकर याने कार्यालयाच्या परीसरात तरुणीला भेटून कडवे साहेब चांगले आहेत, तुझे काम करून देतील असे सांगतांनाच तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत. महावितरणमधील या प्रकरणी अनेक संघटना आक्रमक झाल्यानंतर अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आला.







