भादलीत सात बंद घरे फोडली : लाखोंचा ऐवज चोरीला
जळगाव : तालुक्यातील भादली येथील मस्जिद रोड आणि राडे वाडा या भागातील सात घरांना चोरट्यांनी टार्गेट करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामस्थांमध्ये घबराट
दोन दिवसांपूर्वीच वरणगाव परीसरातील तब्बल 11 बंद घरे फोडत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याची घटना ताजी असताना जळगाव तालुक्यातील भादली येथे बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला. एकाच गावातील पाच बंद घरांसह दोन बंद दुकाने फोडल्याने खळबळ उडाली. गावातील मस्जिद रोडवरील राहणारे राजेंद्र रमेश चौधरी, दीपक जनार्दन चौधरी आणि तुळशीदास श्रावण चौधरी, रडे वाडा येथील रामचंद्र बाबुराव रडे, चिंधू वामन रडे यांची बंद घरे फोडून दागिन्यांसह रोकड लांबवली तर काशीनाथ सखारा रडे यांचे किरणा दुकान आणि योगेश हेमचंद्र झांबरे यांचे श्रीराम ग्रो ट्रेंडर्स हे दोन दुकानेही फोडून मुद्देमाल लांबवण्यात आला. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडण्यासाठी कटरचा वापर केला. कुलूप तोडून त्यांनी घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावेळी घरातील कपाटील सामान अस्ताव्यस्त करण्यात आला.
दुचाकीवरून चोर्या करणारी टोळी सक्रिय
बुधवारी पहाटे रडे गल्लीत राहणार्या एका महिलेला तीन दुचाकींवर सहा चोरटे जातांना दिसून आले होते. त्यावेळी गावात चोरी झाल्याचे लक्षात आले आहे. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचानामा करण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी ठसे तज्ज्ञ व डॉग स्कॉड पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.







