डांभूर्णी शेत शिवारातून विद्युत तारांची चोरी
यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील शेती शिवार मधील रोहित्र वरील शेती पंपासाठी वीज कनेक्शन पुरवण्यात आलेल्या खांबाच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या असुन 960 मिटर लांबीचे सुमारे 23 हजार रुपये किमतीचे तार चोरी झाले आहे. तेव्हा या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्युत तारांची चोरी
डांभुर्णी ता. यावल येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डांभुर्णी शेती शिवारात गट क्रमांक 337 व 338 हे क्षेत्र वसीम खान यांचे आहे. या शेतात शेतीपंपासाठी विद्युत कनेक्शन देण्यासाठी विजेचे खांब आणि तार टाकण्यात आले होते. सदर विजेच्या खांबावरील हे विद्युत तार मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केले यात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्र क्रमांक ग्रुप नंबर 79 मधील दोन वेगवेगळ्या खांबावरील तब्बल 960 मीटर लांबीचे विद्युत तार चोरी झाले आहे या तारांची किंमत सुमारे 23 हजार रूपये असुन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सदरील तार चोरी करीत विद्युत वितरण कंपनीचे 23 हजार रुपयाचे नुकसान केले आहे. तेव्हा या संदर्भात भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 36 नुसार यावल पोलीस ठाण्यांमध्ये अभियंता तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच शेती शिवारातून विद्युत तार चोरीला जाण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. यापूर्वी देखील राजोरा, चुंचाळे आदी शेत शिवारातुन विद्युत तार चोरीला गेले होते. त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. विद्युत वितरण कंपनीचे तार चोरीला गेल्या नंतर शेतकर्यांना शेती पिकाला वेळेवर पाणी देता येत नाही व त्यांच्या पिकाचे नुकसान होते तेव्हा पोलिस प्रशासनाने अशा पद्धतीने विद्युत चोरी करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.







