महान कवी प्रतापसिंग बोदडे यांचे मुक्ताईनगरात भव्य स्मारक उभारणार
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अभिवादन सभेत घोषणा : कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाखांचा निधी : गायक अन् कलावंतांनी गीतांद्वारे श्रद्धांजली
मुक्ताईनगर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जिवंत ठेवण्याचे व गतिमान करण्याचे कार्य कलावंतांनी गायनाच्या माध्यमातून केले आहे. वामनदादा नंतर त्यातील मोठे नाव म्हणजेच प्रतापसिंग बोदडे यांचे आहे. या महान कवी गायक प्रबोधनकार कलावंत असलेल्या प्रतापसिंग बोदडे यांचे मुक्ताईनगरात भव्य असे स्मारक उभारणार असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुक्ताईनगरात रविवारी दिली. शहरातील प्रवर्तन चौकात महाराष्ट्राचे लाडके कवी गायक दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित शोकसभा कार्यक्रमाप्रसंगी मंत्री आठवले बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
याप्रसंगी रीपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, भुसावळचे माजी नगरसेवक रवी सपकाळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री रामदास आठवले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. नंतर दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गायक कलावंतांची गीतातून श्रद्धांजली
नंतर प्रभाकर पोखरीकर, दत्ताजी शिंदे, शाहीर राजेंद्र कांबळे, वैशाली शिंदे, राजू बागुल, शकुंतला जाधव, मुकुंद ओव्हाळ, चंद्रकला गायकवाड, अशोक निकाळजे, प्रकाश वानखेडे, मैना कोकाटे, प्रमोदिनी साठे, प्रेम धांदे, संतोष गाडे, नंदा नांद्रेकर, कैलास सकपाळ, शाहीर शिवाजी कांबळे, सपना खरात, गणिता गव्हाळे, देविदास येवले, मदन वरगट, शेषराव मेश्राम यांच्यासह असंख्य कवी, गायक कलावंतांनी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना आपल्या गीतांतून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमानंतर मंत्री आठवले यांनी बोदडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. शासनातर्फे त्यांना पाच लाखांचा निधी देण्याचे घोषित केले.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
अभिवादन सभा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रीपाइंचे युवक तालुकाध्यक्ष महेंद्र हिरोळे यांच्यासह जिल्हा, तालुका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. रीपाइंचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.