अज्ञात वाहनाच्या धडकेने पहाणच्या शेतकऱ्याचा मृत्यू
पाचोरा : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने येथील शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. भडगाव रोडवरील हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डनजवळ हा अपघात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या घटनेप्रकरणी अज्ञात क्रुझर चालकाविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेने शेतकऱ्याचा मृत्यू
पहाण, ता.पाचोरा येथील शेतकरी प्रमोद दत्तु पाटील (४६) हे शनिवार, १८ जून रोजी सकाळी मोटरसायकलने चाळीसगाव येथे बैलजोडी बघण्यासाठी गेले होते. दरम्यान चाळीसगावहुन पाचोऱ्याकडे येत असतांना हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डन समोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन निघाले असता पाचोऱ्याकडून भडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात क्रुझरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने प्रमोद पाटील हे खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. प्रमोद पाटील यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी प्रमोद पाटील यांना मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात क्रुझर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतकऱ्याच्या मृत्यूने शोककळा
मयत प्रमोद पाटील यांच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक भाऊ, एक बहिण, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे प्रमोद पाटील यांच्या अकस्मात निधनाने पहाण गावासह परीसरात शोककळा पसरली आहे.