भुसावळात शिवसेना वर्धापनदिनानिमित्त सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात
भुसावळ : भुसावळ तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा वर्धापन दिन मध्यवर्ती कार्यालयात नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिवसैनिक शरद जोहरे व शिवभोजन केंद्राचे संचालक, नमा शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेच्यावतीने माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पक्षवाढीत स्व.दायमा यांचे योगदान
जिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे म्हणाले की, दरवर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन आपण मोठ्या जल्लोषात साजरा करतो मात्र यंदा स्व.राजेंद्रजी दायमा यांचे निधन झाल्याने कार्यक्रमाला दुःखाची किनार आहे. शिवसेना वाढीसाठी ज्यांनी जिवाचं रान केले व पक्ष बांधणीसाठी स्वतःला झोकून दिले त्या दायमाजी यांचे निधन झाले आहे. निष्ठावंत आणि प्रामाणिक सच्चा शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजेंद्रजी दायमा होते, असेही ते म्हणाले.श्रद्धांजलीपर मनोगत प्रा.धीरज पाटील व विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे आदींनी केले. सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचा आवाहन श्री संतोष सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.धीरज पाटील यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना महिला आघाडीचे पदाधिकारी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.