विधानपरीषद निवडणूक : काँग्रेसच्या आक्षेपामुळे निकालास विलंबाची शक्यता
मुंबई : विधानपरीषद निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या दोन सदस्यांच्या मतदानावर काँग्रेस पक्षाने आक्षेप नोंदवला आहे परीणामी मतमोजणीत विलंब होण्याची शक्यता आहे.
10 जागांसाठी निवडणूक
सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या कालावधीत विधान परीषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपतर्फे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन सदस्यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या अन्य आमदारांच्या उपस्थितीत व त्यांच्या मदतीने मतदान केल्याचे काँग्रेसने म्हटले असून ही दोन मते रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
नियमानुसारच मतदान : गिरीश महाजन
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गिरीश महाजन यांनी या दोन्ही सदस्यांनी नियमानुसारच मतदान केले असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही सदस्यांनी जसे मतदान केले होते, अगदी तसेच याच वेळेसही केले आहे. मात्र विरोधकांनी बालीश आरोप केला असून निवडणूक आयोग याला फेटाळून लावेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दिल्लीत बैठक
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने घेतलेल्या आक्षेपाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत बैठक घेतली आहे. या बैठकीत सदर आक्षेपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीत याच प्रकारे आक्षेप घेतल्याने मोठा विलंब लागला होता. याचीच पुनरावृत्ती विधानपरीषद निवडणुकीत देखील होणार का ? याकडे आता लक्ष लागले आहे.