Eknathrav Khadse Won MLC Election विधान परीषद निवडणुकीत नाथाभाऊंचा दणदणीत विजय
Eknathrav Khadse Won MLC Election मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेसह चुरशीच्या झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी निवडणुकीत विजय संपादन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. तब्बल े पावणे तीन वर्षानंतर नाथाभाऊंची विधीमंडळात एंट्री होणार आहे.
समर्थकांचा विजयापूर्वीच जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांच्या समर्थकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. ते विजयी होणार अशी अपेक्षा असल्याने समर्थक मोठ्या संख्येने कालपासूनच मुंबईत दाखल झाले होते तर सोमवारीदेखील समर्थक मुंबईत दाखल झाले होते. विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांनाच एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी विधान भवन परिसरात टरबूज फोडून जल्लोष केला होता.
महाविकास आघाडीचा सावध पवित्रा
विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणार्या जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर होताच यासाठी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. यातच 10 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा फटका बसल्याने महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला. खरं तर बहुतेक वेळेस या निवडणुका बिनविरोध होत असतात. तथापि, भाजपने आपला पाचवा उमेदवार मैदानात उतारल्याने चुरस वाढली.
दहाव्या जागेसाठी मोठी चुरस
भाजपतर्फे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. शिवसेनेतर्फे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना तिकिट मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांना तिकिट मिळाले. आकड्यांचा खेळ पाहता भाजपचे चार, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र दहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली. यात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारात काटे की टक्कर होणार असल्याचे संकेत मिळाले. तथापि, याऐवजी एकनाथराव खडसे यांचा गेम करण्याची रणनिती समोर आली. भाजप नेत्यांनी सर्व पक्षांमधील खडसे विरोधकांशी हातमिळवणी करण्याची रणनिती आखली. यामुळे राष्ट्रवादी आणि स्वत: एकनाथराव खडसे यांनीही आपल्या परीने मोर्चेबांधणी केली.
खडसेंचे आता खर्या अर्थाने पुर्नवसन
दरम्यान, निवडणुकीआधी चारही पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षीत जागी ठेवले. तसेच लहान पक्ष व अपक्षांना आपलेसे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पडद्याआड खूप नाट्य रंगल्यानंतर सोमवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान झाले. यानंतर सायंकाळी 5 वाजता याची मतमोजणी सुरू झाली. काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी रखडली. यानंतर सायंकाळी सुमारे सात वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाली. यात एकनाथराव खडसे विजयी झाले. गेल्या सुमारे पावणे तीन वर्षांपासून राजकीय विजनवासात असणार्या एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांना या विजयामुळे दिलासा मिळाला असून त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे.