पर्यावरण पूरक अंत्यसंस्कारातून झाडांना जीवदान
पर्यावरण पूरक अंत्यसंस्कारातून झाडांना जीवदान
मुक्ताईनगर : शहरातील नगरपंचायतीचे प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक संतोष उर्फ बबलू कोळी यांचे वडील स्व.प्रल्हाद पंढरीनाथ कोळी (75) यांचे शुक्रवार, 4 जून रोजी निधन झाले. वृक्ष प्रेमी व निसर्ग वन प्रेमी असलेले नगरसेवक संतोष कोळी यांनी दुःखद व भाविक प्रसंगाला सामोरे जात वडिलांच्या मृतदेहावर पर्यावरण पूरक अंत्यविधी करण्याचे ठरवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. अमळनेर येथील जनसेवा फाऊंडेशन व अमळनेर गोशाळा यांचे यासाठी सहकार्य लाभले.
लाकडांऐवजी गौर्यांचा वापर
या पर्यावरण पूरक अंत्यसंस्कारात पार्थिव शरीराच्या दहनासाठी लाकडांचा अजिबात वापर केला जात नाही. त्याऐवजी गोशाळेत गायीच्या शेणापासून तयार झालेल्या मोठ्या आकाराच्या गोवर्या, गाईचे शुद्ध तूप, कापूर आणि चंदनाचा वापर केला जातो. स्मशानात चितेभोवती व स्मशानातील फाटकापर्यंत सुंदर रांगोळ्या स्मशानातील फाटकापर्यंत व मृत व्यक्तीच्या घराजवळ देखील रांगोळ्या काढल्या जातात. चिता आणि परीसर फुलांनी सजविण्यात येतो. या प्रकारच्या अंत्यसंस्कारात डिझेल, पेट्रोल, रॉकेल आणि लाकूड यांचा वापर करण्यात येत नाही. यावेळी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात किमान एका झाडाचे लाकूड वाचते, असे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

