खिर्डी खुर्द गावातील बुरूज व गावदरवाजा ठरतोय धोकादायक
गावाची ओळख टिकून राहण्यासाठी पुर्नजीवन करण्याची मागणी
खिर्डी : खिर्डी खुर्द येथील गावातील जुन्या काळातील शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक गावदरवाजा व बुरूज्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. हा दरवाजा व बुरूज केव्हा जमिनीवर कोसळेल याचा भरवसा नाही. बुरूजासह गाव दरवाजा ऐन गावाच्या मध्यभागी असून येथे रात्र-दिवस ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी मोठे बाजारपेठही भरते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून बुरुज व गाव दरवाज्याच्या छतामध्ये जागोजागी तडा पडल्याने पावसाचे पाणी शिरत असल्याने तडा वाढवून अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी व बुरूजाला पुर्नजीवन मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बुरुजाच्या तडांमुळे अपघाताची भीती
संबंधित प्रशासनाने गावदरवाज्याची वेळोवेळी पाहणी व दुरुस्ती न केल्याने त्यास पडलेल्या तड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. बुरुज व गाव दरवाजा केव्हाळी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाच्या पाण्यामुळे ही परीस्थिती अधिक प्रमाणात बिकट होवू शकते व यामुळे मोठी जीवीतहानी घडू शकते. हा गावदरवाजा अत्यंत जुन्या काळातील असून आजरोजी शंभराहून अधिक वर्षे जुना झाला आहे. सध्याची परीस्थिती पाहता गावदरवाज्याची व बुरूजाची परीस्थिती पुर्णपणे जीर्ण झाली आहे. हा परीसरत वर्दळीचे ठिकाण असून छतावरील विटा व बुरूजाच्या भिंती कोसळून काही अप्रिय घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, खिर्डी सरपंच राहुल फालक म्हणाले की, आम्ही बांधकाम विभागाच्या कार्यालयातून जीर्ण बुरूज व गावदरवाजा पाडण्याची रीतसर परवानगी आणली असून लवकरच त्यास पाडण्यात येणार आहे.

