सांगली जिल्ह्यातील ‘त्या’ नऊ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड
सांगली : सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळले होते मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सोलापुरातील दोघा भोंदू मांत्रिकांना अटक केली आहे. अब्बास महंमदअली बागवान (48, रा.सरवदेनगर, सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवसे (30, रा. जुना पुना नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नांदगाव येथील 11 वर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू
गुप्तधनाच्या आमिषातून विष देवून केली हत्या
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता.मिरज) येथील वनमोरे कुटुंबीयांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. स्थानिक पोलिसांनी गावकरी आणि वनमोरे यांच्या मित्रांकडे चौकशी केली असता डॉ.माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोघा भावांची अनोळख्या व्यक्ती सोबत गुप्तधनाबाबर भेटी होत होत्या. अनोळख्या व्यक्तीने वेळोवेळी वनमोरे यांच्याकडून पैसे घेतले होते. पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्ती मांत्रिक असल्याचे कळाले. चौकशीअंती दोन आरोपी सोलापूरमध्ये असताना त्यांना घरातून अटक करण्यात आली. दोघांनी दिलेल्या माहितीत, 19 जून 2022 रोजी वनमोरे यांच्या घरी गेले होते. त्यांनी वनमोरेंना विषारी औषध घेऊन दिले. हे औषध जेवणातून घेतल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.


वनमोरे बंधूंनी व्यवसायासाठी नव्हे मांत्रिकासाठी कर्ज घेतले
मृत पोपट यल्लाप्पा वनमोरे व डॉ.माणिक यल्लाप्पा वनमोरे हे दोघे भाऊ मांत्रिकाच्या आहारी गेले होते. तत्पूर्वी, डॉ.वनमोरे यांची प्रॅक्टिस चांगली सुरू होती. चांगल्या मिळकतीमुळे पतसंस्थेत ठेवही केली परंतु मांत्रिकाच्या नादी लागल्यानंतर पैशांची चणचण भासू लागली. त्यामुळे सावकारांकडून तसेच ओळखीच्या मंडळींकडून उसने पैसे घेतले. त्यांनी व्यवसायासाठी पैसे घेतले नसून मांत्रिक व अंधश्रद्धेपोटीच्या विधीसाठी पैसे घेतल्याचे तपासात पुढे आले.