अवैध वाळू उत्खनन करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

मुक्ताईनगरात महसूल विभागाला मनसेचे निवेदन


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून सर्रासपणे अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू असून अवैधरीत्या सुरू असलेली वाळू वाहतूक थांबवून धडक कारवाई सुरू करावी, अशी मागणी नायब तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मनसे पदाधिकार्‍यांनी केली.

मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक
मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीनांदुसह रीगाव, भोटा, धुपेश्वर तापी-पूर्णा नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा उपसा जेसीबी व पोकलॅण्ड मशीनच्या सहाय्याने अहोरात्र सुरू आहे. महसूल प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल या माध्यमातून बुडवला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवैध वाळू वाहतुकीविरोधात दंड थोपटले असून या प्रकाराला तातडीने आळा न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांबाब तहसीलदार श्वेता संचेती यांना पुराव्यानिशी माहिती दिल्यानंतरही त्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन मुक्ताईनगर येथील पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी वाळू वाहतूकदारांवर धडक कारवाई सुरू केल्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता मात्र त्यांच्या बदलीनंतर मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू वाहतुकीचे प्रकार सुरू झाले आहेत.



तर तीव्र आंदोलन
अवैधरीत्या वाळू वाहतुकीवर कारवाई होवून ही वाहतूक न थांबल्यास दोन दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मधुकर भोई, मंगेश कोळी, गजानन पाटील, प्रमोद मिस्तरी, प्रमोद जावळे, शांताराम महाराज भील, गणेश जुंबळे यांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !