फैजपूरातील प्रभाग रचनेत घोळ : माजी नगरसेवक शेख कुर्बान यांची तक्रार
फैजपूर : शहरातील नगरपरीषद निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक विभागामार्फत निश्चित केली जात आहे. या प्रकरणात फैजपूर येथे मतदारांच्या संख्येनुसार निवडणूक विभागाकडून प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर फैजपूर येथील माजी नगरसेवक शेख कुर्बान यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रार अर्जानुसार प्राप्त झालेल्या प्रभाग याद्यांनुसार काही प्रभागांच्या मतदार संख्येमध्ये दिडीचा तर काहीमध्ये दुपटीचा फरक आढळून येत असल्याचे दिसत आहे.
तर निवडणूक आयोगाकडे तक्रार
मतदार संख्येनुसार प्रभाग संरचना करताना 100 ते 200 मतदारांची संख्या प्रभागानुसार कमी-जास्त असू शकते परंतु उपलब्ध प्रभाग क्रमांक दोन ते सातच्या उपलब्ध आकडेवारीनुसार प्रभाग संरचना ही सर्व नियमांना फाटा देऊन विशिष्ट लोकांना फायदा होण्याकरिता प्रभाग संरचना केल्याची दिसून येते. कारण सदर आकड्यांचे अवलोकन केले असता प्रभाग क्र 7 मध्ये एकूण मतदार 1454 आहेत तर प्रभाग क्र 2 मध्ये एकूण मतदार 3537 आहेत. ही बाब लोकशाहीतील मतदारांच्या अधिकाराला बाधक ठरणारी आहे. जाती, धर्म या बाबी नाकारत कोणत्याही प्रभागाची मतदार संख्येमध्ये इतर प्रभागाच्या मतदार संख्येमध्ये 100 ते 200 मतदारांपेक्षा संख्या कमी-जास्त न ठेवता नवीन मतदार संख्येनुसार संरचना करून लोकशाही बळकट करण्याकरिता फैजपूर येथील मतदारांना न्याय देण्यात यावा अन्यथा पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात पिटीशन दाखल व निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येईल, अशी मागणी माजी नगरसेवक शेख कुर्बान यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

