भुसावळ गटविकास अधिकार्यांकडून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी
भुसावळ : भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून तक्रार मागे न घेतल्यास परीवार संपवण्याची धमकीही दिल्याचा आरोप पाटील यांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे. या संदर्भात भुसावळ शहर पोलिस प्रशासनाकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे.
तक्रार मागे न घेतल्यास जीवे ठार मारण्याची धमकी
महेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा की, मंगळवार, 21 रोजी गटविकास अधिकारी विलास भाटकर यांना काहुरखेडा प्रकरणातील चौकशीसंदर्भात् भेटण्यासाठी पंचायत समितीत गेल्यानंतर त्यांनी दिलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून दबाव टाकला शिवाय तक्रार मागे न घेतल्यास तुझ्यासह परीवाराला संपवून टाकू, अशी धमकीही दिली. या संदर्भात स्थानिक पोलिस प्रशासन व वरीष्ठ स्तरावर तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, भाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

