मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र कार्यालयाचे रूपांतर डम्पिंग ग्राऊंडमध्ये
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांचा आरोप
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र कार्यालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या प्रकरी दोषी असलेल्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी केली आहे. मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत मुक्ताईनगरसह बोदवड व भुसावळ या तीन तालुक्यांतील वनक्षेत्र येतात. या वनक्षेत्राद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासनाकडून दरवर्षी कोटींचा निधी खर्च केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा हे या जाहिरातींसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह प्रिंट माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र कार्यालयातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या कार्यालयातील संबंधित अधिकार्यांकडून आजतागायत एकही पर्यावरणपूरक वृक्षाची लागवड करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले नसल्याचा आरोप डॉ.सोनवणे यांनी केला आहे.
वनपरीक्षेत्र कार्यालयच समस्यांच्या गर्तेत
वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या आवारातच कचर्याचा फार मोठा ढीग जमा झाला आहे. दारूच्या बाटल्या, भंगार यासह वाढलेले गवत, नगरपंचायतीच्या फुटलेल्या गटारीतून संबंधित कार्यालयात सहा महिन्यांपासून घाण पाण्याचा साठा होत असून या कार्यालयाख्या मुख्य प्रवेशद्वारातून अधिकारी जात-येत असताना त्यांना हा प्रकार दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र कार्यालयाचे डम्पिंग ग्राऊंडमध्ये रूपांतर करणार्या अधिकार्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी विभागीय वनअधिकारी यांच्याकडे केली आहे.
