तब्बल 22 वर्षानंतर मिळाला न्याय : शहिद नरेंद्र महाजनांच्या वारसांना मिळाली शासनाकडून पाच एकर जमीन
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना आले यश ः महाजन कुटुंबियांनी मानले आभार
भुसावळ : सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले भुसावळातील नरेंद्र ओंकार महाजन यांना कर्तव्य बतावजाना मणिपूरात वीर मरण आले होते. ही घटना 11 ऑगस्ट 1999 रोजी घडली होती. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या वीरपत्नी अर्चना नरेंद्र महाजन यांनी शासनाच्या नियमानुसार त्यांना शेतजमीन मिळण्याबाबत मागणी केली मात्र ही मागणी कुठल्याही नियमात बसत नसल्याचे सांगण्यात आले होते. या संदर्भात त्यांचा मुलगा स्वराज नरेंद्र महाजन याने सीआरपीएफ तसेच शासनाकडे पाठवलेल्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधला होता. खासदारांनी या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. अकलूद, ता.यावल येथे महाजन कुटुंबियांना शासनाकडून पाच एकर जमीन मिळाली आहे. महाजन कुटूंबियांनी खासदारांची भेट घेवून जमीन मिळवून दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
खासदारांचे मानले आभार
खासदार रक्षा खडसे यांनी वरीष्ठ स्तरावर महाजन कुटूंबियांना न्याय मिळण्यासंदर्भात पाठपुरावा सुरूच ठेवला होता. खासदारांच्या प्रयत्नांना यश आले असून अर्चना नरेंद्र महाजन यांना शहीद नरेंद्र ओंकार महाजन यांच्या मृत्यू पश्चात तब्बल 22 वर्षांनी मौजे अकलुद (ता.यावल) येथे पाच एकर जमीन मिळाली असून त्याबाबतची कागदपत्रे त्यांना प्राप्त झाली आहे. सीआरपीएफ शहिद जवानाला शासकीय अनुदानात जमिनीचा मोबदला मिळाल्याची ही महाराष्ट्रातील प्रथम घटना असल्याचे बोलले जात आहे.
