JALGAON Shivsena Akorosh Morcha भर पावसात निघालेल्या शिवसेनेच्या भव्य आक्रोश मोर्चाने वेधले लक्ष
बंडखोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी : प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
JALGAON Shivsena Akorosh Morcha जळगाव : शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी शनिवारी जळगाव शहरात शनिवारी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भर पावसात निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली.
जनआक्रोश मोर्चाने वेधले लक्ष
शिवसेनेशी बंडखोरी करणारे जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ शनिवारी जळगाव जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महानगराध्यक्ष शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, डॉ.हर्षल माने, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, गजानन मालपुरे, कुलभूषण पाटील, विराज कावडीया, किशोर भोसले, जाकीर पठाण, प्रशांत सुरळकर, मंगला बारी आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भर पावसात निघाला मोर्चा
चित्रा चौकातून दुपारी भर पावसात मोर्चाला सुरुवात झाली. चित्र चौक, टॉवर चौक, नेहरू चौक, शिवतीर्थ मैदान, बेंडाळे चौक, नेरी नाकामार्गे मोर्चा स्मशानभूमीजवळ पोहचला. स्मशानभूमीच्या बाहेर संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढे मोर्चा मार्गस्थ होऊन अजिंठा चौफुली येथे मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात सहभागी संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, आदित्य साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत शिवसैनिकांनी बंडखोरांविरुद्ध आक्रोश करीत शिवसेना पक्षाचे समर्थन केले.
कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : मेहुणबारे पोलिसात दोघांविरोधात गुन्हा x
हा मोर्चा नाही तर आक्रोश : महापौर
मोर्चाच्या समारोपप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी संवाद साधताना, स्व.बाळासाहेबांची शिवसैनिक मानून मी सर्वांशी संवाद साधते अशी सुरुवात केली. आजचा आपला मोर्चा नाही हा आक्रोश आहे. आपला जोश केवळ आजच नाही तर नेहमी टिकला पाहिजे. येणार्या निवडणुकीत आपला आक्रोश दिसला पाहिजे. आपण सर्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपली ताकद दाखवून दिली आहे. पुढे देखील आपली ताकद अशी कायम ठेवा, असे आवाहन महापौरांनी केले.
आम जनतेच्या बळावर आम्ही निवडून येणार
गुलाबराव वाघ म्हणाले, शिवसेना आणि आम जनतेच्या बळावर आम्ही निवडून येणार आहोत. गुलाबराव तुम्ही ढाण्या वाघ असाल तर राजीनामा द्या आणि निवडून या, असे आव्हान वाघ यांनी केले. तसेच घाबरू नका गुलाबराव किती वाघ असेल, कुणी मंत्री असेल तरी मी तुमच्या सोबत आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मोर्चा सुरु असताना मला एकनाथ शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाचा धमकीसाठी फोन आला. मी त्याला सांगितले हिंमत असेल तर इकडे ये. पोलीस प्रशासनांनी अशा धमक्या देणार्यांना अटक करावी, असे ते म्हणाले. डॉ.हर्षल माने यांनी, शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्यांना जिल्ह्यात घुसू द्यायचे नाही. त्यांच्या घरावर हल्ले करायचे. शिवसेना काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे, असे सांगितले.
