Amalner Gharphodi अमळनेरात सेवानिवृत्त शिक्षकाकडे दिड लाखांची घरफोडी
Burglary of Rs 1.5 lakh from retired teacher in Amalner अमळनेर : मुलाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या एका निवृत्त शिक्षकाचे घर भरदिवसा फोडून दागिने व रोख रकमेसह एक लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला. 30 जून रोजी हरी ओम नगरात ही घटना घडली.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
ढेकू रोडवरील ज्ञानेश्वर यशवंत सोमवंशी हे सेवानिवृत्त शिक्षक आपल्या मुलाच्या लग्नासाठी 30 जून रोजी सकाळी 10 वाजता हरी ओम नगर मधील घराला कुलूप लावून कुटुंबासह शिंदखेडा येथे गेले होते. दुपारी चार वाजता त्यांच्या घरासमोरील आशुतोष निकम यांनी सोमवंशी यांच्या घराचा कडीकोंडा, कुलूप तोडलेले पाहिले. घराचा दरवाजा उघडा असल्याने त्यांनी सोमवंशी याना घरात चोरी झाल्याचे कळवले. साडे पाच वाजता मालक परत आल्यानंतर घरात गेले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. लोखंडी कपाटाचे लॉकर तुटलेले होते.

अमळनेर पोलिसात गुन्हा
घरातील 47 हजार रुपये किंमतीची 17 ग्रॅम वजनाची अंगठी, साखळी, रींगा व तुकडा तर सहा हजार 600 रुपयांची 22 भार चांदी व 80 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 33 हजार 600 रुपयांचा माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. सोमवंशी यांच्या घरात विवाह सोहळा व सत्यनारायण असल्याने उशिरा फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.