सावखेडासीमच्या वृद्धाची रीक्षातून चौघांनी 25 हजारांची रोकड लांबवली
The four took Rs 25,000 in cash from the rickshaw of an old woman from Savkhedasim यावल : रीक्षा चालकासह अन्य तिघांनी वयोवृद्धेचा 25 हजारांची पेन्शनची रक्कम पिशवीतून लांबवली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
रीक्षा चालकासह चौघांवर संशय
तुळशीराम गोंडू पाटील (75, सावखेडासीम) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त कर्मचारी असून पेन्शनधारक आहेत. सोमवार, 4 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते बसने यावल येथे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आले होते. दुपारी एसबीआय बँकेतून त्यांनी 25 हजारांची रोकड खात्यातून काढली व कापडी पिशवीत ठेवली. बसस्थानकाकडे पायी जात असतांना एक अनोळखी रीक्षा चालक त्यांच्याजवळ आला व मी सावखेडा येथे जात आहे. तुम्हाला यायचे आहे का ? असे विचारले. ‘हो’ म्हणत ते रीरक्षाच्या मागच्या सिटवर बसले. त्यावेळी त्यांच्या बाजूला अज्ञात दोन जण अगोदरच बसलेले होते. पुढे अजून एकजण रीक्षा चालकाच्या बाजूला बसला. पुढे जावून सावखेडा रोडवरील कृषी अधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ जावून रीक्षा थांबविली.

यावल पोलिस ठाण्यात गुन्हा
रीक्षा चालक म्हणाला की, मी तेलाची कॅन घ्यायला विसरलो. म्हणून तुळशीराम पाटील यांना खाली उतरवून पुन्हा रीक्षा घेवून चौघेजण यावलच्या दिशेने निघून गेले. दरम्यान त्यांच्या पिशवीतील 25 हजारांची रोकड आढळून आली नाही. रीक्षातील चौघांनी संगनमताने पिशवीतील 25 हजार रूपये चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात 16 बाधीत आढळले