घरकुलांसाठी आदिवासी बांधवांचे यावलला धरणे आंदोलन
मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनावर आदिवासी बांधव ठाम : गायरान जागेमुळे घरकुलांना अडचण
यावल : तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या गायरान येथील 145 आदिवासी बांधवांनी घरकुल मिळावे या मागणीसाठी यावल पंचायत समितीच्या समोर मंगळवार, 5 जुलैपासून आमरण उपोषण छेडले आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. चुंचाळे ता.यावल या ग्रामपंचायत अंतर्गत आदिवासी क्षेत्रांमध्ये गायरान हा परीसर आहे. या गायरान येथील आदिवासी ग्रामस्थांनी यावल पंचायत समितीच्या समोर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
40 वर्षांपासून आदिवासी बांधवांचा रहिवास
यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या गायरान या भागात आदिवासी बांधव गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या गायरानमधील आदिवासी नागरीकांकरीता प्रशासनाकडून जिल्हा परीषदेची शाळा, अंगणवाडी, विहिर, कुपनलिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. असे असतांना या ठिकाणी रहिवास करत असलेल्या नागरीकांना मात्र घरकुल मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ही जागा गायरानची असल्याने त्यावर रहिवासासाठी शासन मान्यता देत नाहीये. जागेची अडचण असून वैयक्तीक लाभाकरीता जागेची अडचण सांगणार्या प्रशासनाकडून येथे सार्वजनिक सुविधा उपलब्ध करतांना ही अडचण का आली नाही घ असा सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.

यांचा उपोषणात सहभाग
या ठिकाणी उपोषणास बिरम बारेला, तुफान बारेला, भुवानसिंग बारेला, सुनील बारेला, वाघ्या बारेला, काशीराम बारेला, महारु बारेला, अर्जुन बारेला, मोहन बारेला, शंकर बारेला, सुनील बारेला, रेवलसिंग बारेला, भरत बारेला, रामदास बारेला, निकेश बारेला, नानल्या बारेला, दिनेश बारेला, मुकेश बारेला, देवसिंग बारेला, काना बारेला, तावलाल बारेला, धुमन बारेला, अनिल बारेला सह आदिवासी बांधव उपोषणाला बसले आहे.