भुसावळात बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट
पोलिस व पालिका अधिकार्यांनी केली कत्तलखान्याची पाहणी : पालिकेकडून कचरा विल्हेवाटसाठी नियोजन
भुसावळ : सलग दोन वर्ष कोरोनामुळे बकरी ईद सण मुस्लीम बांधवांना उत्साहात साजरा करता आला नव्हता यंदा मात्र कोरोना संकट ओसरल्यानंतर यंदा मोठ्या उत्साहात बकरी ईद सण साजरा केला जाणार असल्याने बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर बोकडांची कुर्बानी दिली जात असल्याने या अनुषंगाने शुक्रवारी पोलिस व पालिका प्रशासनाने कत्तलस्थळांची पाहणी करीत समाजबांधवांना सूचना केल्या. दरम्यान, यंदा रविवार, 10 रोजी खडका रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिकरीत्या नमाज अदा केली जाणार आहे.
ब्रेकींग न्यूज : सरपंचांसह नगराध्यक्षांची निवड आता जनतेतून होणार !
यंदा मुस्लीम बांधवांमध्ये उत्साह
सलग दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्याने बकरी ईदचा सण पारंपरीक पद्धत्तीने साजरा झाला मात्र यंदा कोरोना ओसरल्याने मुस्लीम बांधवांकडून मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा कोरोना ओसरल्यामुळे बोकडांचा बाजारातही तेजी आली असून . बोकडांचा भावही वधारला आहे.

पालिकेकडून कचरा विल्हेवाटीसाठी 13 वाहने
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार तसेच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कत्तलखाना ठिकाणांची पाहणी केली. नगरपालिकेकडून वेस्टेज मटेरीयल विल्हेवाटीसाठी तब्बल 13 वाहने लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बोकडाच्या कुर्बानीनंतर वेस्टेज मटेरीयल गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना यावेळी स्वच्छतेबाबत योग्य त्या सूचना करण्यात आल्या. नागरीकांनी वेस्टेज मटेरीयल हे उघड्यावर किंवा इतरत्र कोठेही न टाकता कचराकुंडीत वा नगरपालिकेच्या वतीने नेमण्यात येणार्या गाडीमध्येच द्यावे जेणेकरून त्याची योग्य त्या ठिकाणी सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.
पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त
बकरी ईदच्या अनुषंगाने शहरातील संवेदनशील भागासह धार्मिक स्थळांच्या परीसरात तसेच मिश्र वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात येणार असून दिवसभर पेट्रोलिंग नेमण्यात करून नाकाबंदी लावण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.