साकळी व किनगाव येथील आशा सेविकांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान
यावल : तालुक्यातील किनगाव आणि साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या सर्व आशा वर्करांचा कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र आणि आध्यात्मिक प्रबोधन पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला. ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात साकळी गावात 34 तर किनगाव येथील 12 अशा एकुण 46 आशा सेविकांचा गौरव करण्यात आला.
कोरोना योद्धा म्हणून गौरव
कोरोना काळात ग्रामीण भागात आरोग्य सेवेसह कोरोना जनजागृती करणार्या आशा सेविकांचा यावल प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य संचालिका बी.के.राजश्री दिदी यांनी संगमनेरहुन मेडिकल कॉलेजच्या व्हॉइस प्रिन्सिपल ब्रह्माकुमारी डॉ.योगिनी दीदी यांना आमंत्रित केले होते.

70 टक्के आजार मानसिक स्वरूपाचे
ब्रह्माकुमारी डॉ.योगिनी दीदी म्हणाल्या की, आजच्या तणावाच्या काळात राजयोग मेडिटेशन हे एक अनमोल औषधी ठरत आहे. दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे आज जवळजवळ 70 टक्के आजार हे मानसिक स्वरूपाचे आहेत. यापासून मुक्तीसाठी राजयोग मेडिटेशन हे वरदान सिद्ध होत आहे. शारीरिक दृष्टीने सक्षम असलेली व्यक्ती मानसिक दृष्टिकोनातून कमजोर असू शकते. राजयोग आपल्याला मानसिक दृष्टिकोनातून मजबूत करतो. विकारांमुळे आपली जीवन शैली बदलत चालली आहे त्यामुळे आपल्यातील क्रोधामुळे पित्ताशय, यकृत यासंबंधी आजार वाढतात. चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होते. भीतीमुळे किडन्या आणि मूत्रपिंडाला नुकसान होते. दुःख दाबून ठेवल्यामुळे फुफ्फुस आणि आतड्यांची कार्यक्षमता कमी होते. बी.के. योगिनी दिदी यांनी अरोग्य रक्षक म्हणून तुम्ही स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे आणि जनसामान्य महिला व बालक यांची ही काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला आशा वर्करांना दिला.
रागासह भावनांवर ठेवा नियंत्रण : राजश्री दिदी
यावल सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका राजश्री दिदी म्हणाल्या की, आपण आपल्या रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहाल तर आपोआपच निरोगी व तंदुरूस्त बनाल यासाठी आपल्याला राजयोग मेडिटेशन फार उपयुक्त ठरेल. मोफत राजयोग मेडिटेशन शिकण्यासाठी त्यांनी सर्वांच यावल सेवाकेंद्रावर निमंत्रीत केले. या कार्यक्रमात राजयोगामुळे होणारे फायदे आणि परमात्म्याचा परीचय शशीकांत वारुळकर यांनी करून दिला. किनगाव येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन तर साकळी येथे चित्रा जावळे यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी बी.के.पूजा आणि बी.के.छाया बियाणी यांचे अनमोल सहकार्य लाभले.