सरपंच थेट जनतेतून निवडावा : सरपंच परीषदेची मागणी
मुक्ताईनगर : राज्यातील 27 हजार 800 ग्रामपंचायतींचे व ग्रामीण भागातील जनतेचे लोकहित आणि ग्रामीण विकास होण्याच्या दृष्टीने गावातील गटातटाचे, भावकीचे आणि जातीयवादी राजकारण संपविण्यासाठी थेट जनतेतुन सरपंच निवडावा, अशी मागणी सरपंच परीषदेतर्फे मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन देवून मंगळवारी करण्यात आली.
लोकप्रतिनिधींच्या अधिकारात करावी वाढ
सध्या राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि विधिमंडळ यांनी पुन्हा सरपंच निवड थेट जनतेतून करण्यासंदर्भात ठराव पास करून येणार्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, तसेच सरपंच व उपसरपंच यांच्या अधिकारात वाढ करावी यासाठी सरपंच परीषद आग्रही आहे. याबाबत सरपंच परीषद मुंबईचे राज्याध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी कार्यकारीणीत ठराव पास केला आहे. त्यासाठी मदत म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात यावी तसेच थेट जनतेतून सरपंच निवड होण्याबाबत सोमवारी राज्यभर सर्व तहसीलदार यांना सरपंच परीषदेने निवेदन दिले.

निवेदन देताना यांची उपस्थिती
मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देतांना मुक्ताईनगर तालुक्यातील सरपंच परीषदेचे तालुकाध्यक्ष गणेश श्रीकृष्ण थेटे-पाटील, महिला अध्यक्ष मानकर ,उपाध्यक्ष अतुल चौधरी, उषा गुरचळ, सूर्यकांत पाटील, पांडुरंग तांबे, पुंडलिक तायडे, शीतल गणेश सोनवणे, उज्वला रामचंद्र कोळी, प्रतिभा प्रदीप कोल्हे, सरपंच परीषदेचे सर्व तालुका कार्यकारणी सदस्य व सरपंच उपस्थित होते.