जातो माघारी पंढरीनाथा ! तुझे दर्शन झाले आता !!
श्री विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून मुक्ताई पालखी माघारी
Jato Maghari Pandharinatha! You have appeared now !! मुक्ताईनगर : पंढरपूरात दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर येथून मुक्ताईची पालखी जाते व यंदादेखील आषाढी एकादशीला पालखी निघाल्यानंतर तिने विठ्ठलाचे दर्शन घेतले तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शुक्रवारी झाला तर बुधवारी सकाळी गोपाळपुर्यात पालखी सोहळाप्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज यांचे गोपाळकाला व काल्याचे कीर्तन झाले. भगवान श्री विठ्ठल दर्शन घेवून पालखीने निरोप घेऊन दुपारी माघारी मुक्ताईनगरच्या दिशेने निघाली.
1 रोजी नवीन मुक्ताई मंदिरात पोहोचणार पालखी
आषाढी एकादशीला शेकडो वर्षांची परंपरा जपत मुक्ताईची पालखी कोरोनाचे दोन वर्षांच्या खंडामुळे पांडुरंगाच्या दर्शाने कासावीस झालेल्या भक्तांना घेवून पंढरपुरला गेली होती. बुधवारी गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मुक्ताबाई पादुकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेकपूजा करून साडीचोळी संत ज्ञानेश्वरांकडून अर्पण करण्यात आली तर बुधवारी पालखी मुक्ताईनगरला परत येण्याचा सोहळा झाला. सकाळी सहा वाजता गोपाळपूर येथे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले तसेच भगवान श्री विठ्ठल दर्शन व निरोप घेऊन दुपारी पालखी माघारी मुक्ताईनगरकडे निघाली. सोमवार, 1 ऑगस्ट 2022 रोजी पालखी सोहळा मुक्काम दर मुक्काम विसावे घेत नवीन मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर येथे पोहोचणार आहे. यानंतर नवीन मुक्ताई मंदिर ते जुनी कोथळी समाधी स्थळ मंदिर असा मुक्ताईनगर शहरातून भव्य पालखीचे स्वागत सोहळा होईल. यात वारकरी दिंडी स्पर्धा व टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे मुक्ताईनगर न्हावून निघणार आहे.

शेतकरी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
पंढरपुरात मुक्ताईचे पालखीचे गुरूपौर्णिमेला विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा आनंद सर्व वारकर्यांना आहे. मुक्ताईला साडी-चोळी देण्याचा सोहळा झाला असून बुधवारी मुक्ताईकडे विठ्ठलाचे दर्शन घेवून पालखी निघाली. विठ्ठलाकडे कोरोना जावून सर्व शेतकर्यांना पीक पाणी व सुख समृद्धीची कामना करून सर्व वारकर्यांना पुढील वर्षी परंपरेनुसार पायी दर्शनासाठी येवू देण्याचा साकडे घातले असल्याचे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त शंकरराव पाटील, नीळकंठराव पाटील, पंजाबराव पाटील, पालखी सोहळाप्रमुख रवींद्र रणे महाराज, उद्धव जुनारे महाराज, विजय महराज खवले, नितीन महाराज अहिर, रामभाऊ महाराज झांबरे, लखन महाराज, पंकज महाराज, विशाल महाराज खोले, नरेंद्र नारखेडे, सम्राट पाटील आदींसह पालखी सोहळ्यातील समस्त भाविक उपस्थित होते.