भुसावळ शहरात शिवसेनेतर्फे गुरुजणांचा सन्मान
नमा शर्मा यांचा उपक्रम : गुरूची जागा कुणी घेवू शकत नाही : प्रा.उत्तम सुरवाडे
Shiv Sena Honors Gurujan In Bhusawal City भुसावळ : संगणकाची कितीही क्रांती झाली तरी गुरुची जागा ते कधीही घेऊ शकत नाही कारण गुरू हे संवेदनशील असतात आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जडण-घडणीसोबत माणुसकी विकसित होते, असे प्रतिपादन प्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून येथील शिवसैनिक तथा शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात गुरूजनांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. समाजात विविध क्षेत्रात कार्य करणार्या गुरूंच्याप्रती आदरभाव व्यक्त करून त्यांचे ऋण याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
गुरूजणांचा सहृदय सत्कार
भुसावळ येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाज घडवणार्या गुरूजनांना यावेळी भगवी शाल, पेन, पुष्प व चांदीचा शिक्का देऊन सन्मानित करण्यात आले. शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात इलियास शेख, डॉ.जगदीश पाटील, प्रा.उत्तमराव सुरवाडे, गजानन नीळे, संतोष सोनवणे, प्रा.धीरज पाटील आदी गुरूजनांचा उपस्थित शिवसैनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन देवेंद्र पाटील यांनी तर आभार आयोजक उमाकांत शर्मा (नमा) यांनी मानले. प्रसंगी प्रा.उत्तमराव सुरवाडे, संतोष सोनवणे, ललितकुमार मुथा, प्रा.धीरज पाटील, निलेश महाजन, बबलू बर्हाटे, मुकेश गुंजाळ, सूरज पाटील, उमाकांत शर्मा (नमा), राकेश खरारे, अरुण साळुंखे, हेमंत खंबायत, जवाहर गौर, शरद जोहरे, धीरज वरदोंकार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
