चाळीसगावात अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती : आरोपीला 20 वर्ष शिक्षा
जळगाव : चाळीसगाव शहरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणार्या नराधमाला जिल्हा न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 30 हजार रूपयांचा दंड सुनावला.
चाळीसगाव शहर पोलिसात दाखल होता गुन्हा
चाळीसगाव शहरातील एका भागात राहणार्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र उर्फ रितेश बापु निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र निकुंभ याला अटक करण्यात आली.

12 साक्षीदार तपासले
या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या. बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण 12 साक्षिदार तपासण्यात आले. खटला सुरू असतांना अल्पवयीन मुलगी सज्ञान झाल्याने तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा दिर्घ आजाराने मृत्यू झाल्याने तिची साक्ष नोंदविता आली नव्हती त्यामुळे यात यात पिडीतेचे वडील, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांची साक्ष महत्वपुर्ण ठरल्या. साक्षीपुराव्याअंती रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ याला दोषी ठरवत विविध कलमान्वये 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड.चारूलता बोरसे काम पाहिले. केसवॉच म्हणून दिलीप सत्रे यांनी सहकार्य केले.