संततधार पावसाने नागझिरी नदीला पूर : रावेरात घरांमध्ये शिरले पाणी
रावेर : रावेर परीसरात संततधार पावसामुळे शहरातील नागझिरी नदीला पूर आला तर जुना सावदा रोडवरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली तसेच काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे अन्न-धान्यासह संसारोपयोगी वस्तूंचे काहीसे नुकसान झाले.
सलग 18 तासांपासून पाऊस सुरूच
रावेर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजता पावसाला सुरूवात झाली. सोमवारी सायंकळापर्यंत 18 तासांपेक्षा अधिक काळ पाऊस सुरू असल्याने पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. हा पाऊस पिकांसाठी अत्यावश्यक असल्याचे मानले जात आहे. तालुक्यातील सुकी मध्यम प्रकल्प रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे भरला असून या धरणाच्या सांडव्यावरून 10 सेंटिमीटर पाण्याचा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. यापूर्वीच मंगरूळ धरण भरले असून भोकर नदीला पूर आला आहे. सोमवारी झालेल्या पावसाने रावेर शहरातील नागझिरी नदीला पुराचे पाणी आल्याने शहरातील जुना सावदा रोडवरील पुलावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद पडली तर नवीन सावदा रोडलगत राहणार्या काही अतिक्रमितांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे काहीसे नुकसान झाले.
