Looting At Nashirabad Toll Booth By Bogus Machine : Bing Broke After Complaint नशिराबाद टोल नव्हे झोल प्लाझा : बोगस मशिनींद्वारे वाहनधारकांना दररोज लाखोंचा गंडा
नशिराबाद टोल नाक्यावरुन दोन बोगस मशीन दीपककुमार गुप्तांच्या तक्रारीनंतर जप्त : संबंधिताविरोधात गुन्हा : दोषींची होणार सखोल चौकशी
Nashirabad Toll Not Zhol Plaza: Daily Bilking Of motorists Through Bogus Machines नशिराबाद : नशिराबाद टोल नाक्यावर फास्टटॅग नसलेल्या वाहन धारकांकडून पावती देताना अनधिकृत मशीनद्वारे पावती देवून दररोज लाखोंची वसुली सुरू असल्याची तक्रार जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे केली होती. तक्रारीची खातरजमा करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक गठण करत कारवाई आदेश दिले. गुरुवारी रात्री साध्या वेशात पोलीस वाहनधारक बनून गेल्यानंतर त्यांनी टोल नाक्यावर पैसे दिल्यावर पथकातील कर्मचार्यांना देण्यात आलेल्या पावत्या बनावट आढळताच पथकाने थेट छापा टाकून ही कारवाई केल्याने जळगाव जिल्ह्याच मोठी खळबळ उडाली.
टोलचा झोल लाखोंचा
जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गावर असलेल्या नशिराबाद येथील टोल नाक्यावर बोगस पावत्यांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरु असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पोलीस विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या विशेष पथकाला तक्रारीची पडताळणी तसेच कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पथकाने टोल नाक्यावरून दोन फेक मशीन जप्त केल्या असून नशिराबाद पोलिसात शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या मशीनद्वारे जमा झालेली रक्कम नेमकी कुणाच्या खात्यावर जमा होत होती शिवाय या पापाचे भागीदार नेमके कोण-कोण आहेत? गेल्या किती दिवसांपासून हा धूळफेक करण्याचा प्रकार सुरू होता शिवाय या साखळीतील पडद्याआडच्या मातब्बर चेहर्यांना पोलिस प्रशासन प्रामाणिकपणे अटक करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

साध्या वेशातील पथकाच्या छाप्याने उडाली खळबळ
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल फुला, पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, सचिन विसपुते, पोलिस शिपाई अजमल बागवान, भारत डोखे, आसीफ तडवी यांच्या पथकाने गुरुवारी अत्यंत गोपनीयता ठेवत कारवाई केली.