वरणगाव पाणीपुरवठा योजनेचा ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फैलावर
वरणगाव : शहराला मुबलक व स्वच्छ स्वरूपाचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी 25 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असुन योजनेचे काम ठेकेदाराला सुद्धा देण्यात आले मात्र संबंधीत ठेकेदाराकडून गत अडीच वर्षांपासून काम संथगतीने सुरू असल्याने तसेच योजनेच्या कामातील जलवाहिनी टाकण्यासाठी शहराच्या विविध भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्यानंतर त्यात जलवाहिनी न टाकल्याने शहरवासीयांचे होणारे हाल पाहता संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी नगरपरीषदेत जावून मुख्याधिकार्यांसमक्ष ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले.
भाजपाने अनेकदा छेडले होते आंदोलन
वरणगाव शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकांच्या बळावर 25 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा मंजूर केली होती मात्र सुरूवातीलाच ठेकेदाराला काम देण्याच्या कारणावरून तीनवेळा निविदा नामंजूर करण्यात आली. यानंतर आपल्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पाणीपुरवठा योजनेची निविदेला मंजुरी देण्यात आली. मात्र, राज्य शासनाकडून तांत्रिक अडचणीच्या कारणास्तव मंजुरी देण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून भाजपाच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन छेडण्यात आले होते. यामुळे राज्य शासनाने तांत्रिक अडचणी दूर करून निविदेनुसार ठेकेदाराला काम दिले मात्र संबंधीत ठेकेदाराने अडीच वर्षापासून काम संथगतीने सुरू ठेवले. शहराच्या विविध भागातील रस्ते खोदून त्यामध्ये जलवाहिनी टाकणे बंधनकारक असतांना ठेकेदारानेकेवळ रस्ते खोदून ठेवले व त्यामध्ये जलवाहिनीच टाकली नाही. यामध्ये आंबेडकर नगर, प्रतिभा नगर, सिध्देश्वर नगर, रामपेठ भागासह नवीन विस्तारीत भागाचा समावेश आहे तर रस्ते खोदून ठेवल्यामुळे या भागातील नागरीकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामही संथगतीने सुरू असल्याने शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरवासीयांच्या भावना संतप्त होत आहेत.



राष्ट्रवादी पक्षाने ठेकेदाराला धरले धारेवर
गेल्या अडीच वर्षांपासून मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम ठेकेदारामार्फत संथगतीने केले जात आहे. यामुळे शहरवासीयांच्या अडचणीत होणारी वाढ लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी नगरपरीषदेचे कार्यालय गाठून मुख्याधिकारी समीर शेख यांच्या समक्ष संबंधीत ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले तसेच केलेल्या कामाच्या व्यतिरीक्त ठेकेदाराला बिलाची रक्कम अदा करण्यात येवू, नये अशी विनंती केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, दीपक मराठे, राजेश इंगळे, नलु इंगळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शरद चौधरी, पप्पू जकातदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ठेकेदाराने काम जलद गतीने करण्याची दिली ग्वाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी संताप व्यक्त करीत काम जलद गतीने न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी ठेकेदाराने सर्वांसमक्ष योजनेचे काम जलद गतीने करून खोदलेल्या रस्त्यांमध्ये त्वरीत जलवाहिनी टाकण्यात येईल, अशी ग्वाही दिली.