भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त हवालदाराचे भुसावळात जल्लोषात स्वागत
24 वर्षांच्या सेवेत केली चमकदार कामगिरी : रेल्वे स्थानकापासून निघाली मिरवणूक
भुसावळ : भारत मातेच्या रक्षणासाठी सलग 24 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या हवालदार काशीनाथ सोनवणे यांचे मंगळवारी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात व औक्षण करून स्वागत करण्यात आले. भुसावळातील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी असलेल्या सोनवणे यांनी प्राणाजी बाजी लावत जम्मूकाश्मीरसह अमरनाथ यात्रा तसेच सैन्याच्या विविध ऑपरेशनमध्ये सहभागी होवून कौतुकास्पद कामगिरी केली. मायभूमीत जवानाचे झालेले स्वागत पाहून जवानाचा उरही दाटून आला.
24 वर्ष मायभूमीच्या सेवेत कार्यरत
भुसावळातील रहिवासी असलेले हवालदार काशीनाथ सोनवणे हे 6 ऑक्टोबर 1998 रोजी महू येथील भरतीप्रसंगी भारतीय सैन्यदलात सहभागी झाले होते. सेवाकाळात त्यांनी ऑपरेशन विजयमध्ये सहभाग नोंदवला तसेच जम्मू काश्मीर, अमरनाथ यात्रा बंदोबस्त, 30 आरआर राष्ट्रीय रायफल सेना, सीआय ऑपरेशन पार पाडले तसेच एनएसजी कमांडो म्हणून 2008 ते 2012 दरम्यान सेवा बजावली. विविध ठिकाणी केलेल्या 24 वर्षांच्या चमकदार कामगिरीनंतर नुकतेच ते सेवानिवृत्त झाल्यानंतर मायभूमीत मंगळवारी परतल्यानंतर गुलमोहर कॉलनीवासीय तसेच कुटुंबियांनी त्यांचे रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी ढोल-ताशांचा गजर करण्यात आला तसेच औक्षण करून घरापर्यंत जवानाची मिरवणूक काढण्यात आली.




यांची कार्यक्रमास उपस्थिती
रेल्वे स्थानकावर बाहेर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात भुसावळातील प्रसिद्ध शर्मा इस्टेट डेव्हलपर्सचे संचालक अनुराग शर्मा, अर्चना प्रेमकुमार शर्मा, गोपाल तोताराम कोळी, भरत कोळी, मिलिंद कोळी, सचिन पारधे, चंद्रभागा सोनवणे, अनिल कोळी, रोशन केदारे, पिंटू कोळी, चेतन केदारे तसेच गुलमोहर कॉलनीवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.