जळगावात 35 वर्षीय तरुणाचा खून


जळगाव : शहरातील प्रशांत सिध्देश्‍वर जंगाळे (35) या तरुणाचा अज्ञात कारणावरून चाकूने भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जेएमपी मार्केटजवळ या तरुणाचा मृतदेह आढळला. कोंबडी बाजाराजवळ असणार्‍या एका अंडापावच्या गाडीवर वाद झाल्यानंतर या तरुणाशी आरोपींशी झटापट झाल्यानंतर या तरुणाचा खून झाल्याची चर्चा आहे. काही अंतरावरच या तरुणाच्या पायाला लागलेल्या रक्ताचे ठसे आढळल्याने आरोपी व मयतांमध्ये झटापट झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी श्‍वान पथकालाही पाचारण केले असून नेमक्या खुनाच्या कारणांसह आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

पोलिस अधीक्षकांची भेट
युवराज हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या जेएमपी मार्केटमध्ये जैन ग्लोबल एंटरप्रायजेस या दुकानाच्या ओट्याला लागून रक्तबंबाळ अवस्थेत मृत तरुण आढळल्यानंतर घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, सहायक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम, सहायक निरीक्षक गणेश बुवा दाखल यांनी धाव घेतली. दरम्यान, कोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर अंडापावच्या गाडीवर बुधवारी रात्री प्रशांतचा अज्ञात आरोपींशी वाद झाल्याने आरोपींनी प्रशांतच्या छातीत चाकूने वार केले व तेथून जीव वाचवण्यासाठी तो तशाच अवस्थेत धावत सुटल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडल्याचे दिसून आले.


कॉपी करू नका.