आठ वर्षांपासून वॉण्टेड दरोडेखोर जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


पारोळा रस्ता लूट प्रकरणात आरोपी वॉण्टेड : गोपनीय माहितीवरून मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या

जळगाव : पारोळा शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विचखेडे गावाजवळ सहा दरोडेखोरांनी गोळीबार करीत ट्रक चालकाला मारहाण करीत दरोडा टाकल्याची घटना 8 जून 2012 रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांपासून आरोपी वॉण्टेड होता. या प्रकरणी गोपनीय माहितीवरून साबीर उर्फ मोनू युसुफ मुसलमान (30, रा.बिजली ऑफिस जवळ, चिंचोली रोड, मुंडी, ता.पूनासा, जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश) यास मुंडी शहरातून अटक करण्यात आली.

लूट प्रकरणी दाखल होता गुन्हा
पारोळा नजीक असलेल्या विचखेडा गावाजवळ 5 ते 6 इसम 20 वयोगटातील जीन्स पॅन्ट व शर्ट घातलेल्या दरोडेखोरांनी मालट्रक (एम.एच.05 के.8814) अडवत फिर्यादी व साक्षीदारांना लाथाबुक्यांनी मारझोड करून व बंदुकीने गोळीबार करून त्यांचे खिशातील 26 हजार 850 रुपयांच्या रोकडसह पलायन केले होते. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन भाग – 5 गु.र.न 103/2012 भादवि 397 आर्म ऍक्ट 4/25 बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून अटक
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन , हवालदार रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे ,दादाभाऊ पाटील, दीपक पाटील , हवालदार इद्रीस पठाण, प्रकाश महाजन, गफुर तडवी, वैशाली महाजन आदींनी गोपनीय माहितीवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला तपासकामी पारोळा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

अट्टल आरोपी
अटकेतील आरोपी साबीर उर्फ मोनू युसुफ मुसलमान हा मध्य प्रदेश व महाराष्ट्रात बाल वयापासुन दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे करीत असल्याचा आरोप आहे शिवाय मध्यप्रदेश राज्यातील जावर पोलिस स्टेशन अंतर्गत दरोड्याच्या गुन्ह्यात साबीर उर्फ मोनू युसुफ मुसलमान यास 10 वर्षाची शिक्षा झाल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.