चारशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप : मुक्ताईनगरातील गौण खनिज प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात ; ईटीएस पथक दाखल
Allegation of 400 Crore Scam: Investigation of minor mineral case in Muktainagar begins ; Enter the ETS team मुक्ताईनगर : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंवर गौण खनिज उत्खनन प्रकरणात चारशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करीत या प्रकरणाची लक्षवेधीद्वारे चौकशीची मागणी केली होती. शासनाने या प्रकरणी चौकशीची घोषणा केल्यानंतर सोमवारी मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे ईटीएस पथक दाखल झाले असून चौकशीला प्रारंभ झाल्याने खळबळ उडाली आहे. पथकाने पहिल्याच दिवशी उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप केले. हे पथक तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या वृत्ताला भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी दुजोरा दिला.
हिवाळी अधिवेशनात मांडली होती लक्षवेधी
हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यात 33 हेक्टर 41 आर जमीनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप करून विधानसभा लक्षवेधी केली होती. या अनुषंगाने राज्य शासनाचे ईटीएस विभागाचे पथक सोमवारी मुक्ताईनगर तालुक्यात दाखल झाले असून गौण खनिज उत्खननाच्या 400 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे.


काय आहे नेमके प्रकरण ?
हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात आमदार चंद्रकांत पाटील यांनी 26 डिसेंबर रोजी सांगितले होते की, मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर.जमिनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली असा आरोप केला. आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जानेवारी 2019 मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकारी यांनी याला तत्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले.
लाखो ब्रास गौण खनिजाच्य उत्खननाचा आरोप
खरं तर येथे 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल 400 कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा सनसनाटी आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.
पथकाकडून चौकशीला सुरूवात
या अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या गौण खनिज उत्खननाची चौकशीसाठी राज्य शासनाचे ईटीएस पथक दाखल झाले असून घोटाळ्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे. पथक दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या वृत्ताला भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दुजोरा दिला आहे.


