धुळ्यात सव्वा कोटींचा गुटखा जप्त : जळगावच्या सात आरोपींना अटक
गुटखा तस्कर हादरले : दोन आयशर जप्त : रॅकेटचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा
Gutkha worth a quarter of a crore seized in Dhule : Seven accused from Jalgaon arrested धुळे : धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमडाळे गाव शिवारात दोन आयशरमधून तब्बल एक कोटी 23 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यातील गुटखा तस्करांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, गुजरातमधून गुटख्याची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले असून सातही जळगावातील आरोपींच्या अटकेने खान्देशात खळबळ उडाली आहे.
सात संशयितांना अटक
धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांना गुटखा तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पश्चिम देवपुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमडाळे गाव शिवारात सोमवारी रात्री सापळा रचण्यात आला. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आयशर (क्रमांक एम.एच. 04 एफ.जे.3048) व (एम.एच.04 एच.डी. 7350) आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा आढळल्याने दोन्ही वाहने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. दोन्ही वाहनात तब्बत एक कोटी तेवीस लाख रुपये किंमतीचा गुटखा आढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या मोजणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सात संशयीतांविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हे गुजरातमधून गुटख्याची तस्करी करून तो जळगावकडे आणत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक
किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषीकेश रेड्डी, दत्तात्रय उजे, कबीर शेख, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, मंगा शेमले, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, कर्नल बापु चौरे, शरद पाटील आदींच्या पथकाने केली.