ताप्ती गंगात दरोडा : दोघे दरोडेखोर लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

नंदुरबार : सुरत-छापरा ताप्तीगंगा रेल्वे गाडीत रेल्वे प्रवाशांना लुटणार्या दोघा आरोपींना पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. राहुल पंढरीनाथ पाटील उर्फ रामजाने व शेख तस्लीम शेख मसूद (रा.श्रद्धा नगर, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, राकेश येवले पसार त्याचा कसून शोध सुरू आहे.
4 रोजी पडला होता दरोडा
4 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तिघा आरोपींनी चार प्रवाशांकडून तीन मोबाईल व रोख असा 37 हजार रुपयांचा माल लुटला होता. सुरत-छापरा ताप्तीगंगा एक्सप्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर येत असताना गाडीत तिघा आरोपींनी प्रवेश करीत एकाने चाकू मारून तसेच मारहाण करून राजस छदीलाल यादव (रा.पारसीसतपूर, उत्तरप्रदेश ह.मु.कडोद्रा, सुरत), धुरेंद्र बलेश्वर महातो, गोलुकुमार भरत महातो (रा.धरमपूर खैरा, जि.छापरा) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच चाकूने मारहाण करून जखमी करीत त्यांच्याकडून तीन मोबाईल आणि खिशातील रोख 18 हजार 500 रुपये असा एकूण 37 हजार रुपयांचा माल लुटून पोबारा केला होता. नंदुरबार रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता.
गोपनीय माहितीवरून अटक
घटनेचे गांभीर्य पाहता लोहमार्ग औरंगाबादचे एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, नंदुरबारचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांनी भेट देऊन संशयीत आरोपींचे फोटो तक्रारदारांना दाखवून चौकशी केली. त्यानुसार तीन आरोपी निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली तर अन्य एक पसार झाला आहे.


