ना गाडी पलटली, ना इन्काउंटर झाले ; आतीक अहमदसह तिघांना मरेपर्यंत जन्मठेप
UP mafia Atiq Ahmed, along with three life sentences नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील माफिया आणि समाजवादी पक्षाचा माजी खासदार अतीक अहमद यास प्रयागराज येथील एमपी – एमएलए न्यायालयाने त्याच्यावरील 100 पैकी पहिल्या खटल्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, आतीक अहमदला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतल्यानंतर माध्यमातून दिवसभर गाडी पलटण्याची तसेच इन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवली जात होती ती मात्र फोल ठरली आहे.
हत्याकांड प्रकरणी सुनावणी शिक्षा
बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या 2005 साली झालेल्या हत्याकांडातील साक्षीदार उमेश पाल यांचे अपहरण केल्याप्रकरणी माजी खासदार अतिक अहमद याच्यावर दाखल खटल्याचा न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला. यावेळी अतीक अहमद यास भादंवि कलम 364 असह अनेक कलमांतर्गत दोषी ठरविले. त्यानंतर अतीक अहमदसह दिनेश पासी खान आणि शौलत हनिफ या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्याचप्रमाणे न्यायालयाने एक लाख रूपयांचा दंडही ठोठावला असून ती रक्कम उमेश पाल यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.




फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी
सुनावणीत सरकारी वकिलांनी जास्तीत जास्त शिक्षेची शिफारस करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली. तर अतिक अहमदच्या वकिलाच्या वतीने माफियांचे आजारपण, वय आणि लोकप्रतिनिधी असल्याचा दाखला देत कमी शिक्षेची विनंती करण्यात आली.
हत्येच्या निकाला फाशीची शिक्षा : उमेश पालच्या आईला विश्वास
दरम्यान, उमेश पाल यांच्या आईने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, हा निकाल आपल्या मुलाच्या अपहरणाच्या प्रकरणावर आला आहे. अद्याप हत्येविषयीच्या प्रकरणाचा व निर्णय येणे बाकी आहे. हत्येप्रकरणी न्यायालय फाशीची शिक्षा सुनावेल, अशी खात्री वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.