पुरी एक्स्प्रेसमध्ये साडेसहा लाखांची चोरी : दोघे आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त : अन्य दोन गुन्ह्यांमध्ये चौघा आरोपींना अटक
भुसावळ : अप पुरी एक्स्प्रेसमधून साडेसहा लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरीची घटना 4 डिसेंबर 2019 रोजी पहाटे दोन वाजता गाडीने भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर घडली होती. धाडसी चोरीमुळे लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारासह गोपनीय माहितीच्या आधारावरून लोहमार्ग पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. अमरावतीमधील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी अन्य दोन गुन्ह्यातील चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून गुन्ह्यातील काही मुद्देमालही जप्त केला आहे.
साडेसहा लाखांच्या चोरीची उकल
अप 18421 पुरी-अजमेर एक्स्प्रेसच्या कोच ए- 1 च्या अर्थ 45 व 46 वरून तक्रारदार दीपक नरेंद्रभाई कटपिटीया (68, क्यू.701, आरोही क्रेस्ट सुबसेंट्रल गाता, जिमखाना रोड, साऊथ अहमदाबाद, गुजराथ) हे पत्नीसह प्रवास करीत असताना पहाटे दोन वाजेनंतर गाडीने भुसावळ सोडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या पत्नीची लेडीज पर्स लांबवली होती. या पर्समध्ये 30 ग्रॅमचा एक लाखांचा हार, दहा ग्रॅमच्या 30 हजारांच्या बांगड्या, पाच लाखांचा डायमंड हार, 12 हजारांची रोकड व मोबाईल असा एकूण सहा लाख 57 हजारांचा ऐवज होता. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह अकोला व अमरावती परीसरातील संशयीतांची माहिती काढल्यानंतर अमरावती येथील इम्रान अन्सारी फयाज अन्सारी (30, मज्जीद बंदर स्टेशनजवळ, मुंबई, ह.मु.कमौला ग्राऊंड, जाकिर कॉलनी, अमरावती) व सय्यद हारून सैय्यद सत्तार (45, पठाण चौक, कमोला ग्राऊंडजवळ, बाबादिन एरीया, पहेलवानची गल्ली, अमरावती) यांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच चोरीची कबुली दिली.
साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांचा डायमंड हार, 30 हजारांच्या बांगड्या व मोबाईल मिळून एकूण पाच लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 9 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल केरूरकर, हवालदार अजीत तडवी, जगदीश ठाकूर, शैलेंद्र पाटील, नितीन पाटील आदींच्या पथकाने केली.
मोबाईल लांबवला : दोघे आरोपी जाळ्यात
भुसावळ- अप 12906 हावडा पोरबंदर एक्स्प्रेसमधून फिर्यादी पंचू बर्वी कलाचंद्र बर्वी (35, बागाखाली पोस्ट छतीना, टेहरा, जि.नदीया, पश्चिम बंगाल) 4 रोजी गाडीच्या एस- 1 डब्यातून प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांचा आठ हजारांचा मोबाईल लांबवला होता. लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी किरण प्रकाश वाघ (24, शिवाजी नगर, जळगाव) व सचिन मनोज पाटील (32, शिवाजी नगर, जळगाव) यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मोबाईलसह आठ हजार व नऊ हजार पाचशे रुपये किंमतीचे अन्य दोन मोबाईल जप्त केले आहेत.
पर्स लांबवली : दोघे आरोपी जाळ्यात
भुसावळ- 12848 विशाखापट्टनम एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- 5 मधून प्रवास करणार्या जिन्ना हुसेन अख्तर हुसेन (35, चंगोलिया, कळोबंगा, बरकरा, आसाम) या 19 नोव्हेंबर 2019 मधून प्रवास करीत असताना जळगाव स्थानक येण्यापूर्वी त्यांची पर्स चोरीला गेली होती. त्यात तीन हजार 600 रुपये रोख, एटीएम, आधार कार्ड व पॅनकार्ड असा आदी सामान होता. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकढून एक हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अभिषेक सदाशीव घोपे (24, घाटपुरी, ता.खामगाव) व आकाश आनंदा रावणाकार (20, घाटपुरी, ता.खामगाव) यांना 6 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई लोहमार्गचे निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भरत शिरसाठ, एएसआय मधुकर न्हावकर, हवालदार जय कोळी , राकेश पांडे आदींनी केली.


