पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण मला गप्प करण्यात आले : माजी राज्यपालांच्या दाव्याने खळबळ
Modi govt responsible for Pulwama attack, but I was silenced : Ex-governor’s claim sparks outrage नवी दिल्ली : पुलवामा हल्लयात 40 जवान शहिद झाल्यानंतर देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या हल्ल्याला मोदी सरकारच जवाबदार असल्याचा दावा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्यानंतर नव्या वादाला देशात तोंड फुटले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यांनी मोठा दावा करताना सांगितले की, पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दाव्यामुळे उडाली खळबळ
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभर संताप उसळला होता. याच हल्ल्याच्या संदर्भात सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सत्यपाल मलिक यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सत्यपाल मलिक सदर दावा करताना पाहायला मिळत आहेत.




पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले
पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी या मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते. कसेही करून दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
मोदींनी सांगितले, गप्प रहा
पुलवामा हल्ला झाला, त्या दिवशी पंतप्रधान मोदींशी झालेल्या संवादाबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिले असते, तर हे घडले नसते. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही आत्ता शांत राहा, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
40 जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले
हे ट्विट करताना काँग्रसने मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पुलवामा हल्ला आणि त्यात 40 जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले. जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळाले असते, तर दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त झाला असता. तुम्ही तर या चुकीसाठी कारवाई करणे अपेक्षित होते. पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलेच नाही, तर स्वत:ची प्रतिमा जपण्याचा तुम्ही प्रयत्न केला. पुलवामावर सत्यपाल मलिक यांचा खुलासा ऐकून देश स्तब्ध झाला आहे, असे काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले आहे.