भुसावळात पोटनिवडणुकीसाठी सरासरी 41 टक्के मतदान

तिघा उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद : उद्या कळणार निकाल
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 अ मधील एका जागेसाठी गुरुवार, 9 रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदानाचा वेग काहीसा मंदावला असलातरी दुपारनंतर हळूहळू मतदारांची गर्दी वाढली. शहरातील नाहाटा महाविद्यालय, ताप्ती स्कूल व बर्हाटे विद्यालयातील सात मतदान केंद्रावर मतदारांनी आपला हक्क बजावला. सुमारे 41 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले असून शुक्रवारी सकाळी नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागते? हे मतमोजणी अंती स्पष्ट होणार आहे.
उद्या मतमोजणी अंती चित्र होणार स्पष्ट
या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, भाजपातर्फे रेखा सुनील सोनवणे तर शिवसेनेतर्फे विक्की चव्हाण रींगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी करुणा डहाळे यांनी काम पाहिले. प्रभाग 24 मधील निवडणुकीची प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवार, 10 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. त्यासाठी तीन टेबल लावण्यात येणार आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


